

नाशिकरोड : गोसावीवाडी चौफुलीवर रविवारी सायंकाळी पानटपरीसमोर उभ्या असलेल्या तरुणावर जवळून दोन गोळ्या झाडल्याने खळबळ उडाली. जखमी सुमित अरुण पगारे (३२) याच्या पोटात गोळ्या लागल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सायंकाळी सव्वासातच्या सुमारास सुमित पानटपरीसमोर उभा होता. त्याचवेळी हल्लेखोराने त्याच्यावर फायर केले, गोळ्या पोटात लागल्याने सुमित रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. नागरिकांनी त्याला उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती मिळताच उपनगर व नाशिकरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. हल्लेखोर पसार झाला असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुरावे तपासले जात आहेत.
वर्दळीच्या चौफुलीवर झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी पोलिस उपायुक्त किशोर काळे, सहायक पोलिस आयुक्त अद्विता शिंदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी दाखल झाले. तपासाकामी पथके रवाना करण्यात आली आहेत.
जुन्या गुन्ह्याची पार्श्वभूमी
सुमित पगारे काही महिन्यांपूर्वी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून सुटला होता. त्याच्यावर अमली पदार्थ विक्रीचा गुन्हा दाखल होता. त्यामुळे जुन्या वादातून हा हल्ला झाला का, याचा पोलिस तपास करत आहेत.