

नाशिक : नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील 16 बंदीवानांवर जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. गत वर्षभरात कारागृहातील 54 बंदीवानांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे या बंद्यांची नजर स्पष्ट झाली असून, त्यांना दिलासा मिळाला आहे.
कारागृहातील बंदीवानांची नियमित आरोग्य तपासणी केली जाते. त्यावेळी नेत्ररोग विभागाकडून करण्यात आलेल्या तपासणीत अनेक बंदीवानांना मोतीबिंदू असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार, १६ बंदीवानांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित करण्यात आले. नेत्ररोग विभागाच्या डॉ. राजश्री कुटे, डॉ. शशिकांत आवारी यांनी या बंदींवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया केल्या. शस्त्रक्रियेनंतर बंदीवानांची नेत्रतपासणी करण्यात आली. तसेच गत वर्षभरात जिल्हा रुग्णालयात ५४ बंदीवानांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यामुळे शस्त्रक्रिया झालेल्या बंदीवानांना स्पष्ट दृष्टी मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
या बंदीवानांनी स्वत: नववर्षाचे शुभेच्छा पत्र बनवून ते शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर्स, परिचारिका, कर्मचाऱ्यांना दिले आहे.
नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील १६ बंदीवानांवर नुकतीच मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे त्यांना नवदृष्टी मिळाली आहे. बंदीवानांनी दिलेले शुभेच्छा पत्र आमच्यासाठी प्रेरणादायी आहे.
डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक. नाशिक.