

देवळाली कॅम्प : कारागृहातील बंद्यांचा तणाव दूर व्हावा, त्यांची कुटुंबाशी बांधिलकी कायम रहावी, बंदी व नातेवाईक यांच्यामध्ये जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होण्यासाठी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील शिक्षा झालेले बंदी व नातेवाईक यांच्यासाठी गळाभेट हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. नातेवाइकांचे अनावरण झालेल्या अश्रूमुंळे कारागृहाच्या भिंतीसुद्धा गहिवरल्या.
उपक्रमाचे उद्घाटन जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ. उमेशचंद्र मोरे, विधी प्राधिकरण सचिव न्या. मिलिंद बुरडे यांनी केले. कारागृहाच्या अधीक्षक अरुणा मुगूटराव यांनी प्रास्ताविकात उपक्रमाची माहिती दिली. अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह) प्रशांत बुरडे, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे संयोजन अतिरिक्त अधीक्षक आर. आर. देशमुख, वरिष्ठ तुरुंगाधिकारी व्ही. पी. आत्राम यांनी अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मदतीने केले. प्रयास टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतर्फे बंद्यांच्या पाल्यांना भेटवस्तू, बुद्धिबळ आदी साहित्यांचे वाटप झाले.
न्या. मोरे यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली. सुधारणा व पुनर्वसनाच्या अनुषंगाने असे विविध उपक्रम प्रेरणादायी ठरतील, अशी आशा व्यक्त केली. या उपक्रमात ८८ पुरुष आणि महिला बंद्यांनी सहभाग घेतला. त्यांना भेटण्यासाठी १९३ पाल्य उपस्थित होते. या उपक्रमामुळे नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांचा तणाव आज नाहीसा होऊन त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्यांच्या हृदयात आनंदाचे भरते आले. त्यांनी आपल्या अश्रूंना व भावनांना वाट मोकळी करून दिली.
गळाभेट उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी अतिरिक्त अधीक्षक आर. आर. देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. वरिष्ठ तुरुंगाधिकारी व्ही. पी. आत्राम यांनी आभार मानले. बंदी, त्यांचे पाल्य, नातेवाईकांना कारागृहातर्फे पुरी-भाजी देण्यात आली. टाटा संस्थेच्या अनुपमा मुंडे, प्रवीण महिरे, लखन कुमावत, सुनील कोळी, स्वप्निल देशमुख आदींचे सहकार्य लाभले.