Nashik Farmer Protest | गौळाणे फाटा येथे रिंगरोड बाधित शेतकऱ्यांचा रास्ता रोको

न्याय्य मोबदला व पुनर्वसनाची मागणी; आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडले
Cidco Farmers Rasta Roko Protest
सिडको : महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करताना साहेबराव दातीर , कैलास खांडबहाले आदीसह शेतकरीPudhari
Published on
Updated on

Cidco Farmers Rasta Roko Protest
सिडको : नाशिक रिंगरोड प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी मंगळवारी (दि.१६) सकाळी गौळाणे फाटा येथे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाच्या धोरणांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. अन्यायकारक भूसंपादन, अपुरा मोबदला आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.

प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दातीर आणि कैलास खांडबहाले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शहर व परिसरातील मोठ्या संख्येने बाधित शेतकरी सहभागी झाले होते. आंदोलकांनी सरकार आणि जिल्हा प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत रिंगरोड प्रकल्पातील कथित अनियमिततेविरोधात आवाज उठविला.

Cidco Farmers Rasta Roko Protest
Nashik News | भुसावळ रेल्वे विभागात अनधिकृत विक्रेत्यांचे धाबे दणाणले; ३०५ जणांना रंगेहात पकडले!

आंदोलनामुळे काही काळ महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी एमआयडीसी पोलिसांनी आंदोलनकर्ते साहेबराव दातीर, कैलास खांडबहाले यांच्यासह काही शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली आणि वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.

यावेळी शेतकऱ्यांनी प्रशासनावर संमती न घेता भूसंपादन प्रक्रिया राबविण्याचा आरोप केला. पूर्वीच्या विकास आराखड्यात डीपी रोड आणि टीपी रोड अस्तित्वात असताना नव्याने रिंगरोडचा प्रस्ताव पुढे आणून सुपीक शेती जमीन संपुष्टात आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला.

Cidco Farmers Rasta Roko Protest
Nashik Agriculture News | जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला वेग !

भूसंपादनाच्या मोबदल्यात मोठी तफावत असल्याने अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. योग्य पुनर्वसन, एकसमान व न्याय्य मोबदला तसेच शेतकऱ्यांची लेखी संमती घेतल्याशिवाय कोणतीही भूसंपादन प्रक्रिया राबवू नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आंदोलनस्थळी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस प्रशासनाने आंदोलकांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी शेतकरी प्रतिनिधींनी पोलीस आयुक्तांना निवेदन सादर करून रिंगरोड प्रकल्पातील कथित गैरप्रकारांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

Cidco Farmers Rasta Roko Protest
Nashik Crime News | ज्या प्रेयसीसाठी घर सोडले तिनेच केला घात; अमोल दांडगे हत्याकांडप्रकरणी मुख्य संशयित सोनाली गायकवाड गजाआड

तसेच शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आगामी पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनावर तसेच त्यानंतर मुंबईत मोठे आंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला. शेतकऱ्यांची संमती, न्याय्य मोबदला आणि पारदर्शक भूसंपादन प्रक्रिया राबविल्याशिवाय रिंगरोड प्रकल्पाला विरोध कायम राहील, अशी भूमिका प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेने स्पष्ट केली.

आंदोलनस्थळी सहायक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण तसेच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

logo
Pudhari News
pudhari.news