

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कुंभमेळ्यासाठी सिंहस्थ आवश्यक पायाभूत सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शहरातील प्रस्तावित रिंगरोड प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया वेगाने सुरू आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ यांच्या माध्यमातून खासगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने करण्यात येणाऱ्या भूसंपादनात दिंडोरी तालुक्यातील मौजे वरवंडी येथील ०.३० हेक्टर क्षेत्राची थेट खरेदी यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
बाळकृष्ण पांडुरंग जाधव, चंद्रभान पांडुरंग जाधव, कैलास पांडुरंग जाधव तसेच कल्पना संजय बनकर यांच्या एकत्रित कुटुंबाच्या मालकीच्या गट क्रमांक ९५, ११५ व २२२ मधील एकूण ०.३० हेक्टर क्षेत्राची थेट खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
या प्रक्रियेसाठी बाळकृष्ण पांडुरंग जाधव यांच्या पत्नी मीराबाई जाधव, त्यांच्या सहा मुली, एक मुलगा तसेच चंद्रभान पांडुरंग जाधव, कैलास पांडुरंग जाधव आणि कल्पना संजय बनकर यांच्या परिवारातील सदस्यांसह एकूण १९ जण उपस्थित होते. संबंधितांनी शासनाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक सहकार्य केले.
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडून कार्यकारी अभियंता संदीप पांडागळे यांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून थेट खरेदीची कार्यवाही यशस्वीरीत्या पूर्ण केली. शासनाच्या महत्त्वाकांक्षी परिक्रमा मार्ग प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रियेस सहकार्य करून खरेदी प्रक्रिया पूर्ण केल्याबद्दल जिल्हाधिकारी प्रसाद यांनी जाधव कुटुंबाचे अभिनंदन केले.
सिंहस्थाच्या अनुषंगाने आवश्यक पायाभूत सुविधा वेळेत पूर्ण करण्यास मोठी मदत होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया संबंधित शेतकऱ्यांच्या सहकार्याने टप्प्याटप्प्याने पुढे सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
६२ कोटींचे वाटप ३६२
रिंगरोड भूसंपादनासाठी आतापर्यंत शासनाकडून ३६२ कोटी ३४ लाख २४ हजार ४०५ रुपयांचे वाटप करण्यात आले असून, एक हजार ५३४ अवॉर्ड जाहीर झाले आहेत. याव्यतिरिक्त २५ टक्के अतिरिक्त मोबादला मिळत असल्याने, नागरिक आपल्या जमिनी देण्यास उत्सुक आहेत. सामूहिक जमीन भूसंपादनास येत असलेल्या अडचणींवर संयुक्त बँक खाते उघडणे सोयीचे ठरत असल्याने, त्यादृष्टीने नागरिकांनी विचार करावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
रिंगरोड भूसंपादन प्रक्रिया वेगाने सुरू असून, अनेकजण पैसे स्वीकारत आहेत. सामूहिक गट भूसंपादनास अडचणी येत असल्या तरी, संयुक्त खाते काढल्यास ही अडचणदेखील दूर करणे शक्य होत आहे. वरवंडी येथील तब्बल ९ बहिणींनी एकत्र येऊन भूखंडाचा यशस्वीरीत्या मोबदला मिळविला. सध्या २५ टक्के अतिरिक्त मोबदला दिला जात असल्याने, नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा.
आयुष प्रसाद जिल्हाधिकारी