

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
विहितगाव, वडनेर रोड परिसरातून प्रस्तावित रिंग रोडच्या भूसंपादनाबाबत निर्माण झालेला संभ्रम व नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी खा. राजाभाऊ वाजे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत शेतकरी, जमीनधारक तसेच गुंठेवारी प्लॉटधारक आदींनी रोष व्यक्त करत, जमिनीचा योग्य मोबदला देण्याची मागणी केली. खा. राजाभाऊ वाजे यांच्या अध्यक्षतेखाली वडनेर रोड येथे झालेल्या या बैठकीस परिसरातील शेतकरी, जमीनमालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. बैठकीस प्रांत अधिकारी अर्पिता ठुबे, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, भूसंपादन अधिकारी राजेंद्र वाघ, एमएसआरडीसीचे विजयकुमार कोळी, अभिजित नाईक, बिपीन काजळे, वकील डुंबळे आदी उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
२०१७ मध्ये मंजूर झालेल्या डी. पी. रोडच्या आराखड्यात व सध्याच्या प्रस्तावित रस्त्यात मोठे बदल दिसत असल्याचे सांगत भूसंपादनासाठी आवश्यक असलेले प्रत्यक्ष मार्किंग अद्याप करण्यात आलेले नसल्याने संभ्रम वाढला आहे. कोणत्या सर्व्हे नंबरची जमीन जाणार आहे, त्यावर संबंधित मालकांची नावे स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक असल्याची मागणी यावेळी करण्यात आली.
संयुक्त मोजणी करताना एका जमिनीत दोन मालक असतील, तर दोघांची नावे नोंदविण्यात यावीत, तसेच बाधित जमिनीचा योग्य मोबदला देण्यात यावा, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी मांडली. जमिनीच्या मागील तीन वर्षांच्या व्हॅल्यूएशननुसार मोबदला द्यावा, झोननिहाय दर निश्चित करावेत आणि बालाजी देवस्थानच्या जमिनीचा मोबदला मूळ मालकालाच देण्यात यावा, अशा ठोस मागण्या यावेळी करण्यात आल्या.
नागरिकांच्या शंकांचे निरसन करताना भूसंपादन अधिकारी राजेंद्र वाघ यांनी सांगितले की, हे भूसंपादन कायद्यानुसार केले जात असून, कलम ११ अंतर्गत सर्व शेतकऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली असून, नागरिकांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन खासदार राजाभाऊ वाजे यांनी दिले.
खासदारांकडे मांडल्या तक्रारी
अधिकाऱ्यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर सर्व नागरिक जागेवरून उठून आले आणि एकच गोंधळ करत गर्दी केली होती. यावेळी सर्व अधिकारी व खासदारांना गराडा घालत खासदारांकडे तक्रारी केल्या.
एमएसआरडीसीच्या सल्लागारांच्या अहवालानुसार ६६.६५ मी. रुंदीचा आणि १६.५ किमी लांबीचा रिंग रोड प्रस्तावित आहे. ३.४ किमी भागात मोबदला देण्यात आला असून, उर्वरित ठिकाणी बदल होतील. ज्या ठिकाणी अतिरिक्त जमीन घेतली जाईल, त्याचा योग्य मोबदला देऊ रस्त्याला सर्व्हिस रोडची तरतूद असून, दोन पूल बांधण्यात येतील.
- विजयकुमार कोळी, एमएसआरडीसी अधिकारी