नाशिक : बांधकाम नकाशात बदल करून अॅमेनिटीजच्या जागांवर रो-हाउस बांधून सदर जागा गिळंकृत करणाऱ्या बिल्डरच्या कृत्याविरोधात आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी विधिमंडळात लक्षवेधी दाखल केली आहे.
घर खरेदी करताना ग्राहकांना विविध प्रकारच्या अॅमेनिटीज देण्याचे आश्वासन बांधकाम व्यावसायिकाकडून देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात बांधकाम नकाशात बदल करून अॅमेनिटीजसाठी राखीव जागेवर रो-हाउस बांधले. इतकेच नव्हे अॅमेनिटीजच्या नावाखाली सुमारे साडेचार कोटी तर मेंटनन्सपोटी दोन कोटी २६ लाखांची रक्कम जमा करत बिल्डर फरार झाला आहे. तपोवन रोडवरील आगरटाकळी शिवाराज कर्मा गॅलेक्सी अपार्टमेंटबाबत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी रहिवाशांनी आमदार प्रा. फरांदे यांच्याकडे धाव घेत गाऱ्हाणे मांडले. बिल्डरविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल असून, आ. फरांदे यांनी या प्रकरणी विधानसभेत लक्षवेधी मांडली आहे.
संशयित बांधकाम व्यावसायिकाने अॅमेनिटीजसाठी प्रतिस्क्वेअर फूट २०० रुपयांप्रमाणे सुमारे साडेचार कोटी रुपये, तर २०१७ ते २०१९ दरम्यान वनटाइम मेंटनन्ससाठी प्रतिस्क्वेअर फूट १०० रुपयांप्रमाणे दोन कोटी २६ लाख रुपये जमा केले. मात्र या रकमेची कोणतीही मुदतठेव न करता सरळ हात वर केल्याने बिल्डरकडून आर्थिक फसवणूक केल्याचीही तक्रार रहिवाशांनी केली आहे. मेंटनन्सच्या रकमेपोटी २४ लाखांचा व्याज परतावा अपेक्षित होता; परंतु तलवार यांनी ही रक्कम रहिवाशांची परवानगी न घेता परस्पर खर्च केल्याचे सांगितले जाते. बांधकाम व्यावसायिकाला अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.
या प्रकरणात नोंदणीकृत दस्ताऐवज झाल्यानंतर बांधकाम नकाशात बदल मंजूर करणार्या नाशिक महापालिकेच्या अधिकार्यांनाही सहआरोपी करण्याची मागणी आ. फरांदे यांनी लक्षवेधीव्दारे केली आहे.