

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क | नाशिक शहराला सांस्कृतिक आणि धार्मिकतेचा वारसा मोठ्या प्रमाणात लाभलेला आहे. येथे रंगपंचमीचा उत्सव हा पारंपरिक 'रहाड संस्कृती' म्हणून साजरा केला जातो. रंगाने भरलेल्या मोठ्या हौदात उडी मारुन रंगोत्सव साजरा केला जातो. नाशिकमध्ये पेशवेकालीन परंपरेपासून चालत आलेली 'रहाड संस्कृती' अजूनही नाशिककर पाळत आहेत.
25 बाय 25 फुटांचा चौरस आणि 10 ते 12 फूट खोल पाणी भरलेल्या हौदात एक ठराविक रंग भरुन त्यामध्ये उडी मारली जाते. पाण्यामध्ये उडी मारण्यापूर्वी प्रत्येक रहाडीची विधिवत पूजा केली जाते. त्यानंतर रंगपंचमीच्या दिवशी दुपारनंतर या रहाडीची पारंपरिक रंगांनी पूजा केली जाते. नाशिकमध्ये पेशवेकालीप एकूण 17 रहाडी आहेत. त्यापैकी सध्या शनी चौक, जुने नाशिकमधील तिवंधा चौक, जुनी तांबट लेन, मधली होळी, दंडे हनुमान, कथडा परिसर आणि गोदाकाठावरील दिल्ली दरवाजा येथे रहाड संस्कृती पाळली जात आहे.
रहाडीसह शॉवर डान्सजवळ मंडळांनी बॅरिकेडिंग लावण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या आहेत. रहाडीत एका बाजूने प्रवेश, तर दुसरीकडून बाहेर निघण्याचा मार्ग करण्यास सांगितले आहे. डीजेला मनाई असून, ‘साउंड सिस्टिम’ मर्यादित आवाजात ठेवण्याच्या सूचना आहेत. उत्सवापूर्वी सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे.
विनाकारण रंग आणि पाण्याचे फुगे मारणारे, धिंगाणा करणारे, महिला व तरुणींची छेड काढणारे, टवाळखोर यांच्यावर दामिनी मार्शल्स, निर्भया पथक लक्ष ठेवणार आहेत. टवाळखोरांवर जागेवरच कारवाई करणार आहेत. गुन्हे शाखांची पथके साध्या वेशात तैनात असतील. दंगल नियंत्रण पथकासह जलद प्रतिसाद पथक, होमगार्डची तुकडीदेखील बंदोबस्तावर असेल. पंचवटीत वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, भद्रकालीत गजेंद्र पाटील, सरकारवाडा हद्दीत सुरेश आव्हाड यांच्या पथकांचाही परिसरात बंदोबस्त तैनात असेल.
शहरात आज बुधवारी (दि. 19) रंगपंचमी साजरी होत असून, पारंपरिक रहाडीतील उत्सव काळात गैरप्रकार घडू नयेत, यासाठी शहर पोलिसांनी नियोजन करुन ठिकठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.‘शॉवर डान्स’, रहाड व इतरत्र पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. त्यामुळे टवाळखोरांची रंगपंचमी पोलिस ठाण्यात साजरी होण्याची शक्यता आहे. रंगपंचमीनिमित्त परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त नितीन जाधव, पद्मजा बढे यांच्यासह पथकाने आयोजकांच्या नियोजनावर लक्ष ठेवले आहे. पंचवटीतील शनिचौक, जुने नाशिकमधील तिवंधा चौक, जुनी तांबट लेन, दंडे हनुमान आणि गोदाकाठावरील दिल्ली दरवाजा येथे रहाड उत्सव नेहमीप्रमाणे साजरा होत आहे.
शहरात आज बुधवारी (दि.१९) रंगपंचमी साजरी होत असून, सार्वजनिक मंडळांसह आयोजकांना नियमांच्या चौकटीत रंग खेळण्यास पोलिसांनी सांगितले आहे. साऊंड सिस्टीमचा मर्यादित आवाज, सायंकाळी पाचपर्यंत रहाड, पाण्याचे फुगे न वापरणे, रहाड-शॉवरच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवणे आदी सूचना पोलिसांकडून दिल्या आहेत. त्याचप्रमाणे शहरातील प्रत्येक भागात महिला पथकांसह आयुक्तालयाच्या गुन्हे शोध पथकांचा, स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. सोबतीला दंगल नियंत्रण पथक, राखीव पोलिस दल, जलद प्रतिसाद पथकांची अतिरिक्त बळाची रंगोत्सवावर नजर आहे.
पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली रंगपंचमीचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. त्यानुसार शहरातील परिमंडळ एकमध्ये पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या सूचनेनुसार सहायक आयुक्त नितीन जाधव, पद्मजा बढे यांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे. शहरातील पारंपरिक रहाडी भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक असल्याने तेथे अतिरीक्त पोलिस फौजफाटा तैनात आहे. शनी चौक, जुने नाशिकमधील तिवंधा चौक, जुनी तांबट लेन, मधली होळी, दंडे हनुमान, कथडा परिसर आणि गोदाकाठावरील दिल्ली दरवाजा येथे रहाड उत्सव साजरा होणार आहे. त्या ठिकाणी रंग आणि पाण्याचे फुगे मारणारे, नशेत धिंगाणा करणारे, महिला व तरुणींची छेड काढणारे, टवाळखोरांना पोलिस ताब्यात घेणार आहेत.
रहाड व शॉवरच्या ठिकाणी रंग खेळण्यास सायंकाळी पाचपर्यंत परवानगी असून खबरदारी म्हणून परिसरात सीसीटीव्ही बसविले आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शालिमार, मेनरोडपासून जुने नाशिककडे वाहनाने जाण्यास बंदी आहे. रहाडींसह शॉवर डान्सजवळ बॅरिकेडिंग उभारले जात आहे. साउंड सिस्टीमचा आवाज मर्यादीत ठेवण्याचे आदेश आहेत.
नाशिकमध्ये पेशवेकालीन पुरातन रहाड संस्कृती आजही टिकून आहे. कथडा येथील रहाड ही गेल्या 60 वर्षानंतर खुली करण्यात आली आहे. येथे साजरी होणारी रहाड संस्कृतीमध्ये परिसरातील सर्व हिंदू-मुस्लिम बांधव एकत्र येऊन रंगोत्सव साजरा करतात. परंपरेनुसार रहाडीमध्ये रंग खेळल्याने ऊन बाधत नाही. इडा-पिडा, रोगराई दूर होते असे मानले जाते. येथील प्रत्येक रहाडीला विशेष रंगाच्या पाण्याने भरले जात असून येथील रहाड लाल रंगाच्या पाण्याने भरण्यात आली आहे. रंगपंचमीच्या पूर्वी रहाडीची शांतीपूजा करुन त्यानंतर विविध रंगाचे पूजन करुनच रंगोत्सव साजरा करण्यात येत आहे.
भगवानदादा कहार, संस्थापक, संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज तरुण मित्र मंडळ
पूर्वीच्या काळी पैलवानांची शक्ती प्रदर्शनची जागा म्हणजे रहाड मानाली जात होती. रहाडीमध्ये म्हणजे मोठे हौद यामध्ये पूर्वी कुस्तीचे सामने रंगायचे. कुस्तीच्या आयोजनामुळे या ठिकाणी हाणामाऱ्या होत असल्याने 'राडा झाला' हा शद्बप्रयोग प्रचलित झाला असावा आणि त्यावरून रहाड हा शब्द नाशिक लोकांच्या मनावर कोरला गेला आहे. नाशिकमध्येच रहाड संस्कृती आहे.
दंडे हनुमान चौकातील रहाड - रंग पिवळा
नाशिकमधील काझीपुरा पोलीस चौक परिसरात तीनशे वर्षांपूर्वीची पेशवे कालीन दंडे हनुमान रहाड आहे. पूर्वी येथे बैलगाडीवर मोठमोठे टीप, पाण्याच्या टाक्यातून, रंगपंचमी साजरी केली जात असे. मात्र कालांतराने ही परंपरा बंद पडली. त्यानंतर रहाड खोदण्यात येऊन रंगपंचमी साजरी केली जाते. रहाडीत पिवळा रंग तयार केला जातो. त्याकाळी जवळपास 200 किलो हून अधिक फुलांना एकत्रित करून रंग तयार केले जात होते.
शनी चौकातील रहाड - रंग गुलाबी
पंचवटी परिसरातील शनी चौकातील रहाड पेशवे काळापासून प्रसिद्ध आहे. या परिसरात पेशव्यांचे सरदार वास्तव्यास होते. त्याकाळी ही रहाड कुस्त्या खेळण्याचा हौद होती. रास्ते सरदार या राहाडीची देखभाल करत असत, असे बोलले जाते. शनी चौकातील शनी चौक मित्र मंडळ आणि सरदार रस्ते आखाडा परंपरेने या राहाडीची आजतागायत जपणूक करत आहेत. या रहाडीचा रंग गुलाबी आहे. रहाड झाकण्यासाठी सागाच्या लाकडाच्या मोठ्या ओंडक्याचा वापर केला जातो.
तांबट लेनमधील रहाड - रंग केशरी
पेशवेकालीन पाषाणातील दगडाच्या बांधकामात तयार केलेली ही रहाड आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही रहाड दुर्लक्षित होती. तांबटलेनमधील युवकांनी एकत्र येत ही रहाड खुली केली आहे. या रहाडीचा रंग केशरी असतो. रंगपंचमीच्या दिवशी येथील पाच कुटुंबीयांना पूजेचा मान दिला जातो. पूर्वी रंग तयार करण्यासाठी पळसाची फुले तुळस, चंदनाचा वापर केला जात असे. फुले कढईमध्ये उकळवली जात होती. त्यानंतर पाण्याने भरलेल्या रहाडीत एकजीव केल्यानंतर रंग तयार करुन रहाड भरला जात असे.
तिवंधातील रहाड - रंग पिवळा
तिवंधा चौकात बुधा हलवाईच्या दुकानासमोर ही पेशवेकालीन रहाड आहे. या रहाडीचा रंग पिवळा आहे. हा रंग फुलांपासून बनवला जातो. या रहाडीत महिलांना प्रवेश दिला जातो.
दिल्ली दरवाजा चौकातील रहाड - रंग केशरी
गोदाकाठावरच्या गाडगे महाराज पुलाजवळील दिल्ली दरवाजा चौकात पेशवेकालीन रहाड आहे. पळसाच्या फुलांपासून बनवला जाणारा रंग हे या रहाडीचे वैशिष्ट्य आहे. या रहाडीचा रंग केशरी आहे. रहाडीची देखभाल आणि मान तुरेवाले पंच मंडळ यांच्याकडे आहे. या रहाडीची परंपरा सुरू ठेवण्यासाठी आझाद सिद्धेश्वर दिल्ली दरवाजा मंडळाची स्थापना करण्यात आली होती.