

नाशिक : गोदावरी नदीला आलेल्या महापूरामुळे सर्वाधिक जुना असलेला आणि धोकादायक बनलेला रामसेतू पुल पूर्णत: कमकुवत झाला आहे. त्यामुळे सदरचा पूल पादचारींसाठी देखील पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. बांधकाम विभागाने हा पूल पूर्णपणे बंद करणेबाबत पोलिसांना पत्र देण्याचे निर्देश आयुक्त मनिषा खत्री यांनी दिले आहेत.
नाशिकमध्ये गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे रामसेतू पुलाला मोठा तडाखा बसला आहे. पुलावरील सिमेंट काँक्रीट निघाले असून संरक्षणासाठी लावलेले बॅरिकेट्स तुटले आहेत. रामतीर्थ गोदावरी समितीचे आरतीचे साहित्य ठेवण्यासाठी असलेला एक कंटेनर रामकुंडावरून वाहत येऊन रामसेतू पुलाला धडकून अडकून पडला आहे.
कंटेनरच्या धडकेमुळे आधीच कमकुवत झालेल्या या पुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे हा पूल पूर्णत: धोकादायक बनला आहे. जलसंपदा मंत्री महाजन, आमदार देवयानी फरांदे, ॲड.राहूल ढिकले यांच्यासह आयुक्त खत्री यांनी गोदाकाठावरील या पुलाची पाहणी केली. त्यानंतर महाजन यांनी तातडीने सदरचा पूल तोडून टाकून नवीन पूल बांधण्याचे निर्देश दिले आहे. तसेच तो वाहतूकीसाठी तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आयुक्त खत्री यांनी शहर अभियंता संजय अग्रवाल यांना सदरचा पूल बंद करण्यासाठी पोलिसांना पत्र देण्याचे निर्देश दिले आहेत.
गोदावरीला आलेल्या पुलामुळे सदरचा पूल हा पूर्णत: कमकुवत झाला आहे. त्यामुळे सदरचा पूल बंद करण्यासाठी पोलिसांना पत्र दिले जाणार आहे. या ठिकाणी नवीन पूल प्रस्तावित केला आहे.
मनिषा खत्री, आयुक्त, मनपा