

नाशिक : म्हसरूळ - लिंक रोडवरील राजमाता मंगल कार्यालयासमोर खड्ड्यात पाणी साचल्यामुळे झालेल्या अपघातात रिक्षा उलटून चालक सुनील आहिरे (५५, रा. अवधूतवाडी, पंचवटी) यांचा मृत्यू झाला. याच रस्त्यावर दोन महिन्यांत तिघांचा बळी गेला आहे.
शुक्रवारी (दि. २६) दुपारी 3.30 च्या सुमारास रिक्षाचालक आहिरे हे बळीमंदिर परिसरातून लिंकरोडने जात होते. राजमाता मंगल कार्यालयासमोर रस्त्याचा बाजूला मोठ्या खड्ड्यात पाणी साचले होते. रस्ता छोटा असल्याने त्यांनी गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. परंतु तुंबलेल्या पाण्यामुळे रस्त्याचा अंदाज आला नसल्याने रिक्षा उलटून अंगावर पडली. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच बेशुद्ध झाले. त्यांचा भाऊ अनिल यांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉ. उगले यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. म्हसरूळ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. आहिरे यांच्या मृत्यूनंतर मनपा प्रशासनाने त्या ठिकाणी ड्रेनेजच्या खड्ड्यातील पाणी बाहेर काढत तो बुजविला.
दोन महिन्यांत तीन बळी
रस्त्यावर दोन महिन्यांत जयश्री सोनवणे (२१) यांचा आयशर वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला, तर हितेश प्रवीण पाटील (२६) याचाही याच रस्त्यावर अपघातात मृत्यू झाला.
आम्ही या रस्त्यासंदर्भात प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या, अर्जही केले आहेत. प्रशासनाने हा रस्ता मंजूर केला असून या रस्त्याचे काम अजूनही सुरू झालेले नाही.
सुनील निरगुडे, शिवसेना उपमहानगरप्रमुख
सतत पाऊस सुरू असल्याने कामे करण्यात अडचणी येत आहेत. लवकरात लवकर सर्व खड्डे बुजवण्यात येतील.
समीर रकटे, उपअभियंता, पंचवटी बांधकाम विभाग