नाशिक : जिल्ह्यात परतीच्या पावसाचा जोर कायम आहे. नाशिक शहर व परिसरात गुरुवारी (दि. २६) पहाटेपासून संततधार सरी बरसल्या. त्यामुळे शहरातील रस्ते जलमय झाले, तर गंगापूर धरणाचे दरवाजे पुन्हा उघडल्याने गोदाकाठ पाण्याखाली गेला आहे. हवामान विभागाकडून जिल्ह्याला शुक्रवारी (दि. २७) ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
राजस्थान व कच्छमधून मान्सून माघारी फिरला आहे. त्याचा परिणाम अवघ्या महाराष्ट्रावर झाला असून, पावसाने सर्वत्र दाणादाण उडवली आहे. नाशिकमध्ये सलग चाैथ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. पहाटेपासून जोरदार सरी बरसल्या. दुपारी दोन तास पावसाने विश्रांती घेतली. यादरम्यान, सूर्यनारायणाने दर्शन दिल्याने नाशिककरांना काहीकाळ दिलासा मिळाला. मात्र, सायंकाळी पुन्हा पावसाने हजेरी लावली. सखल भागांमध्ये पाणी साचल्याने शहरवासीयांची कोंडी झाली.
पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरी तालुक्यातही संततधार पाऊस सुरू असल्याने दारणासह अन्य धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच इगतपुरी, पेठ, सुरगाणा, सिन्नर, नांदगावसह अन्य तालुक्यांतही दिवसभरात मध्यम ते जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे ग्रामीण जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून पुढील २४ तासांत जिल्ह्याला अतिपावसाचा इशारा देण्यात आला आहे. परंतु, शनिवार (दि. २८) पासून पावसाचा जोर ओसरणार आहे.