पुणे शहरासह जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड भागात सलग चौथ्या दिवशी विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने दाणादाण उडवून दिली. या पावसामुळे रस्ते जमलय झालेच; शिवाय रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांत पाणी साठल्याने वाहनचालकांची चांगलीच दैना उडाली. दरम्यान, 28 सप्टेंबरपर्यंत शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. बुधवारी दुपारनंतर दोन ते तीन तासांत 124 मिमी पाऊस शहरात पडला. या तीन तासांत वर्षाच्या सरासरीच्या 18 टक्के जास्त पाऊस पडल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. दरम्यान, उद्याही (दि. 26 ) शहरात खूप जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
परतीच्या पावसाने बुधवारी शहराला चांगलेच झोडपले. यामुळे झालेल्या वाहतूक कोंडीने पुणेकरांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. पावसामुळे रस्त्यांवर साचणारे पाणी, पडलेले खड्डे यांमुळे वाहतूक कोंडीचा सामना सर्वसामान्य नागरिकांना करावा लागला. दुचाकीचालक देखील या कोंडीने बेजार झाले होते. 1 किलोमीटरसाठी 1 तासापेक्षा जास्त वेळ लागत होता. तसेच, अनेक रस्त्यांवरील सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने गोंधळ उडाला होता. रात्री 9 नंंतर काही प्रमाणात वाहतूक सुरळीत झाली होती.
बुधवारी दुपारी शहर परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे शिवाजीनगर, डेक्कन, कर्वेनगर, सिंहगड रस्ता, खडकी, रेंज हिल्स, नगर रस्ता, कॅम्प परिसरातील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. कमी वेळेत जास्त पाऊस झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. तसेच, अनेक ठिकाणी मेट्रो आणि उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने वाहतूक संथ गतीने सुरू होती. त्यात पावसाने भर घातली. हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला होता. त्यामुळे बुधवारी अनेक जण कार घेऊन बाहेर पडले होते. सायंकाळी कार्यालय सुटायची वेळ आणि पावसाची वेळ एकच झाल्याने वाहतूक कोंडीत भर पडली. काही ठिकाणी सिग्नल यंत्रणा बंद पडली होती, त्यामुळे वाहन चालकांचा गोंधळ उडाला होता.
शहरात परतीच्या पावसाने पुणेकरांची दाणादाण उडवली असून, बुधवारी दुपारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसात विविध भागांत 9 ठिकाणी झाडपडी आणि 3 ठिकाणी पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, तर दुसरीकडे पावसामुळे वाहतूक संथगतीने झाली होती. शहरात परतीच्या पावसाने जोर धरला आहे. सलग दुसर्या दिवशी म्हणजे बुधवारी दुपारीच काळे गडद ढग दाटून आले आणि अचानक जोरदार पावसाने हजेरी लावली. सकाळी ऊन आणि उकाडा होता. मात्र, काही वेळातच पावसाने तुफान हजेरी लावल्यानंतर रस्त्यांवर पाणीच पाणी झाले. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. शहरात या पावसात वेगवेगळ्या भागांत 9 ठिकाणी झाडे पडली. त्यात हडपसर, भाजी मंडई, काळे बोराटेनगर, पौड रोड, कर्वेनगर, दत्तवाडी, औंध, वडगाव शेरी, धनकवडी या परिसरात झाडे पडली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.
वाहने तासन्तास एकाच ठिकाणी थांबून राहिली पुण्याच्या मुख्य रस्त्यांसह सिंहगड रोड, सातारा रस्ता, नगर रस्ता, सोलापूर तसेच विद्यापीठ परिसर आणि शिवाजीनगर, डेक्कन, कर्वे रस्ता, कोथरूड असा पूर्ण परिसर व अंतर्गत रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. वाहने तासन्तास एकाच ठिकाणी थांबून राहिली होती.
मुसळधार पावसानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. अनेक भागांत गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते. त्यात गंज पेठ, एरंडवणा आणि कोरेगाव पार्क येथे सोसायटीच्या परिसरात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत.
पुणेकरांच्या परतीच्या वेळीच पावसाने हजेरी लावल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. वाहतूक संथगतीने झाली होती. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहने सावकाश चालवावी लागत होती. सिमला ऑफिस, औंध, सिंहगड रोड, फर्ग्युसन रस्ता तसेच शिवाजीनगर भागात वाहतूक कोंडी झाली होती. तर इतर भागांत वाहतूक संथगतीने होती.