नाशिक : जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने जोर पकडला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू आहे. सद्यस्थितीत १२ धरणांमधून विसर्ग होत आहे. 'गंगापूर'चीही दारे पुन्हा उघडण्यात आली आहेत. धरणातून २२१० क्यूसेक वेगाने विसर्ग केल्यामुळे गाेदाघाट पाण्याखाली गेला आहे.
दोन दिवसांपासून उघडीप देणारा पाऊस बुधवारी (दि. ४) मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. त्याने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात त्याचा जोर अधिक असल्याने गंगापूर, कश्यपी, पालखेडसह अन्य प्रकल्पांची दारे उघडण्यात आली आहेत. गंगापूर धरणातून दुपारी 1 ला १,१०५ क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला. दुपारी 3 ला त्यात दुपटीने वाढ केली गेली. त्यामुळे गोदाघाट परिसरातील छोटी-मोठी मंदिरे पुन्हा एकदा पाण्याखाली गेली, तर सांडव्यांवरून पाणी वाहात असल्याने नागरिकांची गैरसोय झाली. कश्यपीमधून ३५० व आळंदीतून ८७ क्यूुसेक विसर्ग सुरू आहे.
इगतपुरीत पावसाचा जोर कायम असल्याने 'दारणा'तून १३०० क्यूसेक विसर्ग कायम आहे. त्याशिवाय भावलीतून २९०, भाममधून ८२०, वालदेवीतून १८३ क्यूसेक वेगाने नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. पालखेड पाणलोट क्षेत्रात पाऊस परतल्याने धरणातून ८४७ क्यूसेक वेगाने विसर्ग केला जात आहे. तसेच नांदूरमध्यमेश्वरमधून १६१४ क्यूसेक वेगाने 'जायकवाडी'कडे पाणी झेपावत आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणांच्या विसर्गात वाढ केली जाऊ शकते.
सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला आहे. सध्या २३ धरणांत ६२ हजार २१२ दलघफू साठा असून हे प्रमाण ९५ टक्के आहे. 10 धरणे काठोकाठ भरली आहेत, तर नागासाक्या प्रकल्प आजही कोरडाठाक आहे. विविध धरणांमधील उपलब्ध जलसाठा लक्षात घेता, जिल्हावासीयांची वर्षभराची पिण्याच्या पाण्याची व सिंचनाची चिंता मिटली आहे.