दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यासह जिल्ह्यातील बहुतांशी भागात सोमवारी मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. वाऱ्यासदृश कोसळणाऱ्या ढगफुटीसह पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. नदी, ओहोळ, नाल्यांना पूर आला. रस्त्यावरही पाणी साचले. तालुक्यातील लहान मोठे कॉजवे पाण्याखाली गेले. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. मुसळधार पावसाने सर्वांचीच दाणादाण उडविली. दरम्यान, गणेशोत्सव तोंडावर आला असतानाच पावसाने पुन्हा जोरदार सुरुवात केल्याने गणेशोत्सवावर पावसाचे सावट आहे.
मागील काही दिवसांपासून पावसाची उपडीप सुरू होती. रविवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू झाली. सोमवारी सकाळपासून पावसाने जोरदार सुरुवात केली. दोडामार्ग तालुक्यात दुपारी १ वा. च्या सुमारास ढगफुटी सदृश्य पावसाला सुरुवात झाली. यावेळी वाराही सुटला होता. दिवसभर पावसाचा जोर कायम होता. परिणामी सर्वत्र पाणीच पाणी झाले. नदी, ओहोळ, नाले तुडुंब भरून वाहू लागले. अनेक लहान मोठे कॉजवे पाण्याखाली गेले. गटारे ओव्हरफ्लो झाल्याने पाणी रस्त्यावर आले.
परिणामी रस्ते जलमय झाले, वाहतूक खोळंबली. दोडामार्ग शहरातील मुख्य राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने तेथे नदीचे स्वरुप प्राप्त झाले. बँक ऑफ इंडिया बँकेच्या समोर रस्त्यावर गुडघाभर पाणी आले. या पाण्यातून वाहने चालवताना चालकांना कसरत करावी लागली. तर म्हावळंकरवाडी येथील कॉजवे पाण्याखाली गेला. परिणामी या वाडीतील नागरिकांचा शहरांशी संपर्क तुटला. येथील आयटीआयच्या परिसरातही पाणी फुगले.
गणेश चतुर्थी सणानिमित्त बाजारपेठा सजल्या आहेत. फिरत्या व्यापाऱ्यांनी फटाके व इतर सामान विक्रीसाठी आणले होते. दोडामार्ग तालुक्यासहीत गोव्यातील नागरिक खरेदीसाठी बाजारपेठेत आले होते. दुपारी अचानक मुसळधार पावसाला सुरूवात झाली अन् सर्वांचीच तारांबळ उडाली. वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे सामान भिजू नये यासाठी फिरत्या व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. गणेश चतुर्थी सणानिमित्त खरेदीसाठी आलेल्या ग्राहक व नागरिकांची पावसामुळे पंचाईत झाली.