नाशिक : त्र्यंबकेश्वर परिसर तसेच गंगापूरच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे. सततच्या पावसामुळे गंगापूर ९० टक्के भरले असून, मागील तीन दिवसांपासून धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे सोमवारीदेखील (दि. २६) गोदावरीची पूरस्थिती कायम असल्याने नदीकाठचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
चालू महिन्याच्या मध्यात विश्रांती घेणाऱ्या पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. त्र्यंबकेश्वर आणि नाशिक तालुक्यांत दमदार पाऊस पडतो आहे. त्यामुळे गंगापूरसह समूहातील चारही धरणांत पाण्याची आवक वाढली आहे. मागील तीन दिवसांपासून गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सद्यस्थितीत ८ हजार ४२८ क्यूसेक वेगाने पाणी नदीपात्रातून प्रवाहित होत असल्याने गोदावरीची पूरपरिस्थिती कायम आहे.
रामकुंड परिसर तसेच गोदाघाटावरील छोटी मंदिरे पाण्याखालीच आहेत. तर पुरामुळे काठावरील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. रामकुंड परिसरातील दशक्रिया विधी व अन्य धार्मिक कार्यक्रमांना अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य व परराज्यातून आलेल्या भाविकांची कोंडी होत आहे. तसेच चाैथ्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधत श्री कपालेश्वर भगवान यांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनाही पूर परिस्थितीचा सामना करावा लागला.
पुराचा सर्वाधिक फटका स्थानिक विक्रेत्यांना बसला आहे. श्रावण मासानिमित्त यंदा मोठ्या प्रमाणात देशभरातून भाविक गोदास्नान व दर्शनासाठी येत आहेत. सध्याचे दिवस हे कमाईचे असताना गत तीन दिवसांपासून पुरामुळे नदीकाठावरील दुकाने बंद ठेवावी लागली आहेत. त्यामुळे विक्रेत्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
यंदाच्या हंगामात गोदेला दुसऱ्यांदा पूर आलाआहे. सलग तीन दिवस गोदाघाट पाण्याखाली आहे. त्यामुळे नाशिककरांची पूर पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. अहिल्यादेवी होळकर पूल, रामसेतू, गाडगे महाराज पुलावरूरुन बघ्यामुळे फुलून गेला आहे. तसेच सोमेश्वर धबधबा, नवश्या गणपती परिसर व तपोवनातही नागरिक पूर पाहण्यासाठी जात आहेत.
पालकमंत्री दादा भुसे यांनी गोदाघाटावरील पूर परिस्थितीची आढावा घेतला. यावेळी अहिल्यादेवी होळकर पुलावरून त्यांनी पुराची पाहणी केली. प्रशासनाने सतर्क राहावे, अशा सूचना करतानाच नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन भुसे यांनी केले.