

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाचे माहेरघर, महाराष्ट्राची चेरापुंजी, धरणांचा तालुका अशी ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे पूर्व भागासह अनेक भागातील तालुक्याचे प्रमुख पीक असलेली भातशेती धोक्यात आली होती. तर अनेक ठिकाणी भाताची रोपे करपण्याच्या मार्गावर होती. मात्र गुरुवार पासून इगतपुरीसह तालुक्यातील अनेक भागात पावसाने पुनरागमन केले असून तालुक्यात श्रावण सरींच्या कोसळधारा सुरू झाल्या असून एकाच दिवसात ९२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढ झाली आहे. पावसाच्या पुनरागमनामुळे भात पिकांना मोठी नवसंजीवनी भेटणार असल्याने बळीराजा सुखावला आहे. तसेच इगतपुरी तालुक्याच्या धरणावर विसंबून असलेल्या उत्तर महाराष्ट्रातील औरंगाबाद, अहमदनगर आदी जिल्ह्यांचा पाणी प्रश्न मिटणार आहे. दमदार पाऊस पडल्यामुळे तालुक्यातील भात पिकाला जिवदान मिळाले असून या संततधार पडणाऱ्या पावसामुळे काही भागातील शेतीला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
संततधार होत असलेल्या पावसामुळे इगतपुरी शहराचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी धबधबे प्रवाहीत झाले आहे. कोसळणारे धबधबे पाहण्यासाठी शनिवार व रविवारी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. घाटमाथ्यावरील इगतपुरी, शहर व परिसरासह कसारा घाट व पाश्चिम पट्टयातील भावली, मानवेढे, बोर्ली, पिंपरीसदो, नांदगावसदो, घोटी, देवळे, आवळखेड, कारवाडी, चिंचलेखैरे, बलायदुरी, पारदेवी त्रिंगलवाडी आदी भागात पावसाने दमदार बरसात केल्याने पश्चिम पट्ट्यात व पूर्व भागात शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
हेही वाचा :