

ठळक मुद्दे
सावकारांकडून कर्ज घेतल्यानंतर व्याजापोटी 10 ते 40 पट परतावा; मूळ मुद्दल तशीच
काही सावकारांकडून महिलांवर अत्याचार
काही सावकारी दमदाटी करून मालमत्ता परस्पर विक्री किंवा स्वत:च्या नावे करत असल्याचे प्रकार
नाशिक : विकास गामणे
शहरात मागील आठवड्यात खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून एकाने जीवनयात्रा संपविल्यामुळे बेकायदा सावकारीचा व्यवसाय पुन्हा फोफावल्याचे चित्र आहे. विनापरवाना अवैध सावकारी करीत कर्जदारांना त्रास देणाऱ्या जाचातून तीन वर्षांत सहा जणांचा बळी घेतल्याची नोंद झाली आहे. सावकारी जाचाच्या जिल्हाभरात एकूण २११ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यातील १४ सावकारांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा उपनिबंधकांकडे आलेल्या तक्रारींवरून विभागाने या कारवाई केल्या आहेत.
जिल्ह्यात खासगी सावकारांची पाळेमुळे घट्ट रुजल्याचे दिसत आहे. सावकारांकडून कर्ज घेतल्यानंतर व्याजापोटी १० ते ४० पट परतावा देऊनही कर्जाची मूळ मुद्दल तशीच राहून अतिरिक्त व्याजाची मागणी सावकारांकडून होत असते. त्यामुळे कर्जदार हवालदिल होतात. त्यातच काही सावकारी दमदाटी करून कर्जदारांकडील मालमत्ता परस्पर विक्री करून किंवा स्वत:च्या नावे करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत, तर काही सावकारांकडून महिलांवर अत्याचार होत असल्याच्या तक्रारी होतात. त्यामुळे कर्जाच्या मोबदल्यात कित्येक पटीने परतावा देऊनही अधिक पैशांची मागणी होत असल्यामुळे कर्जदार हतबल होतात. त्यातून काही कर्जदारांनी जीवनयात्रा संपविल्याचेही प्रकार जिल्ह्यात घडले आहेत.
सावकारांच्या मनमानी पद्धतीला वेसण घालण्यासाठी उपनिबंधक कार्यालयामार्फत नोंदणीकृत सावकारांच्या आर्थिक व्यवहारांची नियमित तपासणी केली जाते. नोंदणीकृत किंवा अवैध सावकारी करणाऱ्यांविरोधात तक्रार आल्यास उपनिबंधक कार्यालयामार्फत संबंधितांवर कारवाई केली जाते. त्यात सावकारांनी कर्जदारांच्या स्थावर मालमत्तांवर मालकी हक्क सांगितल्यास किंवा मालमत्तांचा व्यवहार केल्यास उपनिबंधक कार्यालयाकडून शहानिशा करून कारवाई केली जाते. नोंदणी असलेल्या सावकारांना दिलेल्या परवान्यानुसार त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातच सावकारी करता येते. मात्र अनेक सावकार कार्यक्षेत्राबाहेर कर्जवाटप करत असल्याचे आढळल्याने त्यांच्यावर याआधी कारवाई करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्यांच्या परवान्यावर सावकारी करणे, नियमबाह्य व्याजदर लावणे, नियमबाह्य मालमत्ता गहाण ठेवल्यासही सावकारांवर कारवाई केली जाते.
सावकारी व्यवसाय करण्यासाठी उपनिबंधक कार्यालयाकडे नोंद आवश्यक असते. शहरासह जिल्हाभरात या वर्षात २६५ खासगी सावकार व्यवसाय करणाऱ्यांची नोंद झालेली आहे. गतवर्षी जिल्ह्यात २९० परवानाधारक खासगी सावकार होते.
जिल्हा - नाशिक
एकूण प्राप्त तक्रारी - २११
कलम १६ अन्वये
पूर्ण केलेल्या अर्जांची संख्या - २०३
चौकशीत तथ्य आढळलेल्या अर्जांची संख्या - १४
चौकशीत तथ्य न आढळलेल्या अर्जाची संख्या - १८९
गुन्हा दाखल झालेली एकूण प्रकरणे : १४
चांदवड : १
निफाड : ४
नाशिक : ६
सिन्नर : ३
२३ जानेवारी २०२३ - दीपक शिरोडे, प्रसाद शिराडे, राकेश शिरोड (रा. सातपूर)
मार्च २०२३ - दिलीप रौंदळ
१६ ऑक्टोबर २०२४ : धीरज पवार (सहदेवनगर)
५ सप्टेंबर २०२५ : राजेंद्र परदेशी (शिवाजीनगर)
शेतकऱ्यांनी सहकारी संस्था, सहकारी बँका किंवा राष्ट्रीयीकृत बँकेकडूनच कर्ज घेण्यास प्राधान्य दिले पाहिजे. सावकाराकडून कर्ज घेण्याची वेळ आलीच, तर परवानाधारक सावकाराकडूनच कर्ज घ्यावे.
सावकारांनी कर्जावर आकारावयाचे व्याजाचे दर शासनाने ठरवून दिलेले असतात. त्यामुळे कर्जदारांनी व्याजदर माहिती करून घ्यावेत.
कर्जाची परतफेड नियमितपणे आणि वेळेत करावी. कोणतीही कागदपत्रे पूर्ण वाचल्याशिवाय, समजून घेतल्याशिवाय कर्जदाराने स्वाक्षरी करू नये. कोऱ्या कागदावर स्वाक्षरी करू नये. तसेच सावकारास परत केलेल्या कर्ज रकमेची पावती घ्यावी.
सावकाराने ठरल्यापेक्षा अधिक रकमेची मागणी केल्यास ती देऊ नये. सावकाराकडून त्रास होत असल्यास सहकार खाते किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार करावी.
केवळ नोंदणीकृत सावकारांनाच कर्ज देता येते.
मुद्दल रकमेपेक्षा अधिक व्याज वसूल करता येत नाही.
तारण कर्जासाठी वार्षिक १२ टक्के व्याजाची आकारणी
विनातारण कर्जासाठी वार्षिक १५ टक्के व्याजदराने कर्ज देता येते.
दर तीन महिन्यांनी सावकाराने कर्जदारास वसूल केलेली रक्कम आणि मुद्दल याची पावती देणे बंधनकारक.
महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ अंतर्गत राज्यातील सर्व परवानाधारक सावकारांनी आपल्या व्यवसायस्थळी व्याजदरासंबंधी स्पष्ट माहिती असलेला फलक लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. या फलकावर सावकाराचे नाव, परवाना क्रमांक, कार्यक्षेत्र, परवाना जारी करणाऱ्या कार्यालयाचे नाव व विविध प्रकारच्या कर्जांवर आकारण्यात येणाऱ्या व्याजदरांची माहिती देणे आवश्यक आहे. हा फलक व्यावसायिक ठिकाणाच्या दर्शनी भागात ठळकपणे लावणे बंधनकारक केलेले आहे.
फयाज मुलाणी, जिल्हा उपनिबंधक, नाशिक जिल्हा