

कोल्हापूर : जिल्ह्यात सावकारी कायद्याची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. अवैध सावकारांविरोधात कारवाई केली जाईल, याकरिता संबंधितांनी तक्रारी द्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. वर्षभरात 68 सावकारांवर धाडी टाकून त्यापैकी 20 जणांवर गुन्हे दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, सावकारांकडून होणार्या कर्जदार शेतकर्यांच्या पिळवणुकीस प्रभावी प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 या कायद्यान्वये कारवाई केली जात आहे. याकरिता जिल्हास्तरावर समिती स्थापन केलेली आहे. अवैध सावकारीच्या पाशात अडकलेल्या नागरिकांनी या समितीकडे मदतीसाठी अर्ज करावेत.
जिल्ह्यात अवैध सावकारीबाबत प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार 68 खासगी सावकारांच्या राहत्या घरी, दुकान तसेच व्यवसायाच्या ठिकाणी पथकाद्वारे धाडी टाकल्या आहेत. 20 खासगी सावकारांवर अवैध सावकारीच्या अनुषंगाने कागदपत्र, दस्तऐवज आढळल्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यासह जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे प्राप्त झालेल्या तक्रार अर्जांची चौकशी पूर्ण करून 4 शेतकर्यांच्या शेत जमिनी परत करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच एक चारचाकी वाहन व दोन दुचाकी वाहनेही परत करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.
अवैध सावकारीच्या अनुषंगाने आर्थिक पिळवणूक अगर अवैध सावकारीतून स्थावर मालमत्ता, शेती, जमीन तसेच जंगम मालमत्ता बळकावली असल्यास जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर यांच्या सहकार भवन, पहिला मजला, न्यू शाहूपुरी येथील कार्यालयात प्रत्यक्ष येऊन अथवा किंवा ववीज्ञेश्रहर्रिीीऽसारळश्र. लेा या ई-मेलवर तक्रार अर्ज द्यावेत. अधिक माहितीसाठी 0231- 2656258 या दूरध्वनी क्रमांकावरही संपर्क करावा, असेही आवाहनही यावेळी करण्यात आले.