

देवळा (नाशिक) : भऊर (ता. देवळा) येथील प्रथमेश जगदीश पवार याने सनदी लेखापाल (सीए) अंतिम परीक्षा उत्तीर्ण करून तालुक्याचा व गावाचा गौरव वाढवला आहे. ग्रामीण भागातून असूनही अभ्यासातील सातत्य, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रथमेशने हे यश मिळवले असून, त्याच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रथमेश याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूल, धुळे येथे झाले. त्यानंतर गरवारे कॉलेज व मॉडर्न कॉलेज, गणेशखिंड, पुणे येथून बी.कॉम. पदवी घेतल्यानंतर त्याने सीए अभ्यासक्रमात यशस्वीपणे प्रवेश करून अंतिम परीक्षा उत्तीर्ण केली. या प्रवासात त्याला 'एकत्वम क्लासेस', गालिब मिर्झा, तसेच एसकेडी संस्थापक संजय देवरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. अभ्यासातील सातत्य आणि मार्गदर्शकांचा योग्य उपयोग करून त्याने हे ध्येय साध्य केले.
प्रथमेश पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष जगदीश पवार आणि काळू आनंदा विकास सोसायटीच्या संचालिका हेमलता पवार यांचे पुत्र आहेत. त्याच्या या यशाबद्दल बाजार समितीचे सभापती योगेश आहेर, संचालक भाऊसाहेब पगार, देवळा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर, उमराणे बाजार समितीचे सभापती देवा वाघ, निवृत्त अभियंता एन.डी. पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार आदींसह विविध संस्थांकडून त्याचा सत्कार करण्यात आला.
"आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी परिश्रम घेतले. आज मी सीए झालो याचा आनंद आहे. माझ्या शिक्षणाचा उपयोग राष्ट्रहितासाठी व्हावा यासाठी माझे प्रयत्न सुरू राहतील."
प्रथमेश पवार, सीए