

देवळा : खुंटेवाडी ता.देवळा येथील युवा शेतकरी प्रकाश पगार यांच्या डाळिंब बागेतून बुधवार (दि.१३) रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरटयांनी डाळिंबाची चोरी केली असून,याबाबत देवळा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. शेतातून अशा किमती मालाची चोरी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे .
खुंटेवाडी येथील शेतकरी प्रकाश दामू पगार यांनी आपल्या दीड एकर क्षेत्रात डाळींबाची ४८० झाडांची लागवड केली आहे. या झाडांना चांगला मृगबहर आला असून, डाळींब तयार केले आहेत. या फळबागेत (दि.१३) रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरटयांनी या बागेतील झाडांवरील डाळींब चोरून नेल्याची घटना घडली. यामुळे पगार यांचे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेने शेतकरी भयभीत झाले असून पोलिसांनी अशा चोरट्यांचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी रात्रीचा दिवस करून डाळिंबबागा फुलवल्या आहेत. सध्या डाळिंबाला, कांद्याला चांगला भाव आहे. डाळिंबाची व इतर शेतमालाची चोरी होऊ नये म्हणून शेतकर्यांनी लोखंडी व लाकडी माळे तयार करत त्यावरून राखण केली जात आहे. सध्या डाळींबाला १३० ते २०० रु. प्रतिकिलो असा भाव चालू आहे. शिवारातून डाळिंबाची चोरी होऊ नये म्हणून शेतात उंच माळा तयार करून रात्री त्यावरून बॅटरीचा झोत मारत व 'जागते रहो' चा इशारा एकमेकांना देत शेतकरी शेतमालाचे रक्षण करतांना दिसत आहेत. तर काही शेतकऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. सध्या बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी शेतात एकटे राखण करण्यास घाबरत असल्याचा फायदा चोरटे उचलत आहेत.