

मनमाड (नाशिक) : पुणे–इंदूर महामार्ग... नेहमीप्रमाणेची अवजड वाहतूक सुरू असताना, क्षमतेपेक्षा अधिक माल भरलेला एक ट्रक वेगाने पुढे निघाला. वाहन धोकादायकरीत्या एका बाजूला झुकलेले असतानाही चालकाने सुरक्षिततेची तमा न बाळगता ट्रक सुसाट पळवला. अखेर अंकाई फाट्याजवळ पोहोचताच ट्रकचा तोल गेला आणि तो पलटी झाला. क्षणात मालाचा पसारा आणि धुराचे लोट परिसरात पसरले. सुदैवाने ट्रक डावीकडे कोसळल्याने मोठा जीवितहानीचा प्रसंग टळला; मात्र वाहनाचे नुकसान आणि चालक जखमी झाला. या थरारक घटनेचा संपूर्ण व्हिडिओ मागून दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाने मोबाईलमध्ये कैद केला असून, तो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
या बाबत अधिक वृत्त असे, टीएन 28, एडी 2775 हा 16 टायर असलेला मालट्रक पुण्याकडे जात होता. वाहनात क्षमतेपेक्षा अतिरिक्त माल स्पष्टपणे दिसत होता. परिणामी, ट्रक एका बाजूने झुकला. त्यानंतरही चालकाने वाहन सुरक्षितपणे बाजुला थांबण्याएेवजी मार्गक्रमण सुरू ठेवले. हा धोकायदायक प्रकार पाहून दुचाकीस्वारांनी ट्रकचालकाला आवाज देत धोक्याची कल्पना दिली. मात्र, चालकाने त्याकडे काणाडोळा केला. ट्रकचालक इतरांना जीव धोक्यात घालत असल्याचे पाहून दुचाकीस्वारांनी त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण सुरू केले. शिवाय ट्रकच्या डाव्या बाजूने इतर वाहनचालकांना जाण्यापासून रोखले. अखेर अंकाई किल्ला फाट्याजवळ धावता ट्रक पलटी झाला. सुदैवाने तिथे कुणीच नसल्याने अनर्थ टळला, मात्र ट्रक जर उजव्या बाजूने पलटी झाला असता तर मोठा बाका प्रसंग उभा ठाकला असता. या घटनेत बेजबाबदार ट्रकचालक जखमी झाला असून ट्रकचेदेखील मोठे नुकसान झाले आहे.
ओव्हरलोड अवजड वाहन मार्गक्रमण करीत असतानाही वाहतूक पोलिस की प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) कर्मचाऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आली नाही.
एरवी दुचाकीस्वार, प्रवासी खासगी वाहनचालकांची ठराविक ठिकाणी तपासणी करण्यासाठी पथक नेहमी सक्रीय दिसतात. मात्र या प्रवाशांच्या जिवाशी खेळ करत धावलेल्या ट्रकचा कोणत्याच यंत्रणेला थांगपत्ता लागला नाही, याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.