

नाशिक : भाजपमध्ये झालेल्या प्रवेशावरुन पक्षांतर्गत उफाळलेल्या संघर्षावर सारवासारव करत जुन्या निष्ठावंतांना नक्कीच न्याय देवू, असे आश्वासन भाजप प्रभारी तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. या प्रवेशानंतर भाजप १०० प्लसचा आकडा निश्चितच पार करेल, असा विश्वासही महाजन यांनी व्यक्त केला.
भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात आयोजित प्रवेश सोहळ्याप्रसंगी महाजन बोलत होते. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देशात, राज्यात सुरू असलेल्या विकासामुळे भाजपवर विश्वास निर्माण झाल्याने मुख्य प्रवाहात आता अन्य पक्षातील अनेक लोक आले आहेत. महाविकास आघाडीकडे आता कोणी शिल्लक राहिलेले नाही. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत ८० टक्क्यांवर जागा मिळाल्या. बिहार विधानसभेने महाराष्ट्राचा विक्रम मोडीत काढून त्यापेक्षा अधिक जागा मिळवल्या. संपूर्ण देश भाजपच्या मागे उभा राहिला आहे. महापालिका निवडणुकांत भाजपला १०० प्लस पेक्षाही अधिक जागांवर यश मिळेल हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची आता गरज नाही. यापूर्वीच्या विजयाचे सर्व विक्रम मोडीत काढू, असा दावा महाजन यांनी केला. असे नमूद करत पक्ष प्रवेशावरून जुन्या निष्ठावंतानी केलेली मागणी रास्त आहे. त्यात काहीच चूक नाही. त्यांचे योगदान दुर्लक्षून चालणार नाही. त्यांना योग्य न्याय मिळेल. आता दिवस बदलत आहे. टीका करणारे आता पक्षात येत आहेत. भाजपच विकास करू शकतो यावर त्यांचा विश्वास बसला आहे. आता आपल्याला कुंभमेळा चांगल्या पद्धतीने पार पाडायचा आहे. जुन्या लोकांनी काळजी करू नये. सर्वांना न्याय मिळेल. थोडा फार राग आहे तो रागही निवळेल. जुने व नवे असे एकत्र येऊन काम करू, असे आवाहन महाजन यांनी केले.