

नाशिक : मुंबईत ठाकरे बंधूंची युती जाहीर झाल्यानंतर महायुतीच्या चर्चांना देखील वेग आला आहे. नाशिक महापालिकेसाठी मुंबईत पार पडलेल्या बैठकीत भाजपने शिंदेसेनेसमोर ३० जागांचा प्रस्ताव ठेवला. मात्र शिंदेसेना ४५ जागांवर ठाम राहिल्याने युतीचा तिढा कायम राहिला आहे.
महापालिका निवडणुकीसाठी महायुती, महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आहेत. ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यानंतर महायुतीतील घटक पक्ष देखील ॲक्शन मोडवर आले आहेत. नाशिक महापालिकेसंदर्भात जागावाटपावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री दादा भुसे यांच्यात बुधवारी(दि.२४) मुंबईत बैठक पार पडली.
भाजपने गत निवडणूक जिंकलेल्या ६६ जागा आणि गेल्या काही महिन्यांमध्ये ठाकरे गटासह विविध पक्षांतून आलेल्या १३ माजी नगरसेवकांचा आकडा लक्षात घेता ८०हून अधिक जागांवर दावा सांगत शिंदेसेनेला २५ ते ३० जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र, गत निवडणुकीत धनुष्यबाण चिन्हावर शिवसेनेचेही ३५ नगरसेवक निवडून आले होते. २२ उमेदवार अत्यंत कमी मतांच्या फरकाने पराभूत झाले होते. ५२ ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यातच गेल्या काही महिन्यात अन्य पक्षातून शिवसेनेत माजी नगरसेवक दाखल झाले आहेत. त्यामुळे शिवसेने(शिंदे गटा)ला महायुतीत किमान ४५ जागा मिळायलाच हव्यात, यापेक्षा कमी जागांवर तडजोड केली जाऊ नये, अशी आग्रही मागणी शिंदेसेनेच्या स्थानिक नेत्यांकडून पक्षाचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली. भाजपला युतीचा धर्म पाळायचा असेल तर शिवसेनेला किमान ४५ जागा मिळायला हव्यात, असे शिंदेसेनेकडून सांगण्यात आल्याचे गळते. त्यामुळे युतीत जागा वाटपाचा तिढा बुधवारी देखील सुटू शकला नाही.
नाशिक महापालिकेत शिवसेनेला किमान ४५ जागा मिळायला हव्यात. युतीचा धर्म म्हणून भाजपने ही मागणी मान्य करायला हवी. अद्याप त्यावर एकमत होऊ शकलेले नाही. त्यामुळे नाशिकमध्ये भाजप शिंदेसेनेची युती झाली ही अफवा आहे. त्यात कोणतीही सत्यता नाही. युती संदर्भातील नाशिकचा वस्तुनिष्ठ अहवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे सादर केला आहे.
अजय बोरस्ते, उपनेते, शिवसेना(शिंदे गट)
राष्ट्रवादी चर्चेपासून दूरच
महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदेसेनेत युतीची चर्चा सुरू असली तरी राष्ट्रवादीला मात्र या चर्चेपासून दूर ठेवण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने केलेली ४० जागांची मागणी भाजपला अमान्य आहे. राष्ट्रवादीला ४० तर शिंदेसेनेला ४५ जागा दिल्यातर भाजपच्या वाट्याला केवळ ३७ जागा उरतात. त्यामुळे भाजपने आता केवळ शिंदेसेनेसोबतच चर्चा सुरू ठेवल्याचे सांगितले जाते.