

नाशिक : विकास गामणे
राज्याचे क्रिडामंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारला. त्यामुळे कोकाटेंच्या रिक्त जागी माजीमंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. मात्र, त्यांच्या नावाला वाढता विरोध लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री पवार यांनी अन्य नावांची चाचपणी सुरू केली आहे. यात नाशिक जिल्ह्यातील दिलीप बनकर तसेच माजीमंत्री अनिल पाटील यांची नावे पुढे आली आहेत. उपमुख्यमंत्री पवार नेमके कोणास पसंती देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्याच्या मंत्रीमंडळ विस्तारात उपमुख्यमंत्री पवार यांनी नाशिक जिल्ह्याला झुकते माप दिले होते. जिल्ह्यातून कोकाटे, मंत्री नरहरी झिरवाळ यांना पहिल्या टप्यात संधी दिली होती. यानंतर मुंडे यांच्या रिक्त जागी मंत्री छगन भुजबळ यांची वर्णी लावली होती. त्यामुळे मंत्रीमंडळात नाशिकचे पारडे जड होते. हेवीवेट भुजबळांना शह देण्यासाठी उपमुख्यमंत्री पवारांनी कोकाटेंना संधी दिली. मात्र, कोकाटे असो की, मंत्री झिरवाळ दोघेही मंत्रीपदातून फारशी छाप पाडू शकले नाही. यातच, दोन मंत्रीपदे देऊनही जिल्ह्यातील पक्ष संघटनेला फारसे बळ मिळाले नाही हे खुद्द पवार यांनीच बोलून दाखवले. त्यामुळे निवडणुकांची भुजबळांवरच जबाबदारी सोपविण्यात आली.
कोकाटेंच्या वादग्रस्त कारकिर्दीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाराजी उपमुख्यमंत्री पवार यांनी अनेकदा ओढवून घेतली. विधीमंडळात कोकाटे रम्मी खेळतांनाच व्हीडीओ बाहेर आल्यानंतर, तर, त्यांच्याकडील कृषी खाते काढून घेण्याची नामुष्की ओढविली गेली. यानंतर झालेल्या सदानिका घोटाळा गाजला. यात कोकाटेंचा राजीनामच घ्यावा लागला. कोकाटेंच्या रिक्त झालेल्या जागी मंत्रीपदाची संधी कोणास द्यावयची याबाबत पक्षातंर्गत विचारविनिमय सुरू झाला आहे. यात जिल्हयातून दिलीप बनकरांचे नावाची चर्चा आहे. बनकर हे अजित पवारांचे विश्वासू मानले जातात. याशिवाय जिल्हयातील राष्ट्रवादीच्या आमदारांनाही जिल्हयाचे मंत्रीपद कायम ठेवावे असा आग्रह धरला आहे.
याशिवाय जळगाव जिल्ह्यातील अमंळनेरचे आमदार अनिल पाटील यांच्या नाव पुढे आले आहे. महायुतीस राष्ट्रवादी सहभागी झाल्यानंतर त्यांना मंत्रीपदाची संधी दिली होती. परंतू, गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात त्यांचे मंत्रीपद कायम राहिल अशी अपेक्षा होती. परंतू, पवारांनी नवीन चेह-यांना संधी दिल्याने त्यांना डावलण्यात आले. त्यामुळे पाटील काहीसे नाराज होते. त्यांची नाराजगी अनेकदा दिसूनही आली. मात्र, उत्तर महाराष्ट्रात पक्ष संघटनेचे कामात त्यांनी स्वतःला झोकूण दिले. त्यामुळे त्यांना संधी देऊन, उत्तर महाराष्ट्राचा ढासळलेला असमतोल दूर केला जाऊ शकतो. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, पक्ष वाढीसाठीही त्यांचा हातभार लागू शकतो. त्यामुळे त्यांच्या नावाबाबत गांभीर्याने विचार सुरू असल्याचे बोलले जात आहे.
जळगावला लाला दिवा
मंत्रीमंडळात भाजपने जळगावमधून मंत्री गिरीश महाजन तर, धुळ्यातून जयकुमार रावल यांना संधी दिली. शिंदे शिवसेनेने जळगावमधून गुलाबराव पाटील तर, नाशिकमधून दादा भुसे यांना पुन्हा मंत्रीपदाची संधी देण्यात आली. राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाने नाशिक जिल्हयातूनच कोकाटे व मंत्री झिरवाळ यांना संधी दिली होती. त्यामुळे उत्तर महाराष्ट्राचा समतोल साधण्यासाठी लाल दिवा जळगावकडे जाऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.