मनमाड : नियमबाह्य आणि बेकायदेशीर कामे रोखण्याच्या दृष्टीने मंत्री छगन भुजबळ व माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार संजय पवार यांना सोबत घेऊन एकदिलाने निवडणूक लढविली. सोबत असताना आमच्यावर कुठलेही आरोप झाले नाहीत, मात्र ते आता बाहेर पडून जे आरोप करत आहेत, त्यामागे राजकीय षडयंत्र आहे. बाजार समिती निवडणुकीत केलेल्या भाषणाचा माजी आमदार संजय पवार यांना विसर पडला असल्याची टीका बाजार समितीचे सभापती दीपक गोगड यांनी केली आहे.
भयमुक्त नांदगाव - प्रगत नांदगाव समन्वय समितीने पत्रकार परिषद घेत माजी आमदार पवार आणि माजी नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी केलेल्या आरोपाचे खंडन केले. विनोद शेलार, सभापती गोगड, विजय पाटील, रतन हलवार, संजय निकम, संतोष अहिरे, बाजार समितीचे सदस्य योगेश कदम, हबीब शेख, योगेश जाधव, बबन आव्हाड यांनी भूमिका मांडली.
पवारांच्याच कार्यकाळात बोगस परवाने दिले गेले. परवाना घेतलेल्या एका महिलेने पावणेतीनशे शेतकऱ्यांची फसवणूक केली. त्या सर्व शेतकऱ्यांना आम्ही तातडीने पैसे मिळवून दिल्याचा दावाही यावेळी करण्यात आला.
शेलार म्हणाले, मराठा समाजाला प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी मंत्री भुजबळ यांनी माजी आमदार पवार यांना सभापतिपदाची संधी दिली. त्यांना अपात्र ठरविण्याठी कुणी षडयंत्र केलं, याचा त्यांनी अभ्यास करावा. तसेच ते कोणत्या शक्तीच्या सांगण्यावरून आरोप करताय, असा सवालही केला. तर, संचालक योगेश कदम यांनी, मराठा समाजाचे सर्वाधिक पाच सदस्य निवडून आणण्यासाठी भुजबळ यांनी महत्त्वाचे योगदान दिले. जे आज मराठा समाजावर अन्याय झाला असे सांगत आहेत, त्यांनीच मराठा समाजाचे संचालक अपात्र होण्यासाठी याचिका दाखल केली, असा आरोप केला.