Nashik Politics : जिल्ह्यात महायुती, ‘मविआ’त फूट
नाशिक : जिल्ह्यातील 11 नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी (दि. 17) मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. बहुतांश नगरपरिषदांमध्ये सत्ताधारी महायुतीत फुट पडली असून भाजप, शिंदे शिवसेना व राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गट हे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. येवला नगरपरिषदेसाठी शिंदे गट व महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र आले आहेत. यामुळे मंत्री छगन भुजबळ यांना मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतही बिघाडी झाली आहे. उध्दव ठाकरेंची शिवसेना, काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गट कोठे एकत्र तर, कुठे स्वबळावर रिंगणात उतरली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकही उमेदवार दिला नाही.
जिल्ह्यातील सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, भगूर, सटाणा, चांदवड, नांदगाव, मनमाड, येवला, पिंपळगाव बसवंत आणि ओझर नगरपरिषदेची निवडणूक होत आहेत. आतापर्यंत महायुती एकत्र लढेल अशी घोषणा करणाऱ्या नेत्यांनी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी स्थानिक पातळीवर युती करण्याचे अधिकार दिले. त्यामुळे स्थानिक नेत्यांनी मित्रपक्षांचे बदला घेण्यासाठी कुठे मविआतल्या घटक पक्षांची तर कुठे महायुततल्या घटकपक्षांची साथ घेतल्याने महायुती, महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र आहे. नांदगाव, मनमाडमध्ये भाजप, शिंदेसेना एकत्र आली असतांना येवल्यात शिंदेसेनेने चक्क राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत युती केली आहे. सिन्नर, त्र्यंबकेश्वरमध्ये तर महायुतीतील भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट एकमेकांसमोर उभा ठाकला आहे.
पिंपळगाव नगरपालिकेत राष्ट्रवादी अजित पवार गटाविरोधात भाजप आणि शिंदेसेने युती केली आहे. तर मविआतील काँग्रेसने येथे स्वबळावर रिंगणात उतरली आहे. सटाणा, चांदवड नगरपालिकेत भाजप शिंदेसेना एकत्र असतांना राष्ट्रवादी अजित पवार गट स्वतंत्र निवडणूक रिंगणात नशीब अजमावत आहे. सिन्नर आणि त्र्यंबकेश्वरमध्ये भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने स्वतंत्र उमेदवार दिल्याने तिथे महायुतीतच सामना पहायला मिळत आहे. ओझर नगरपालिकेत भाजप स्वबळावर असून येथे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदेसेनेत युती झाली आहे. इगतपूरीत भाजपने मित्रपक्षांना साथ ठेवण्यासाठी स्वबळाचा नारा दिल्याने शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची अडचण झाली आहे.
येवल्यात शिंदे सेना- शरद पवारची राष्ट्रवादी एकत्र
येवला नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे दोन पक्ष ‘शहर विकासासाठी’ एकत्र आल्याची घोषणा दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केली. शिवसेनेचे आमदार किशोर दराडे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माणिकराव शिंदे यांनी या युतीसाठी नेतृत्व केले. या युतीमुळे भाजप- राष्ट्रवादी अजित पवार गट युती विरुध्द शिवसेना शिंदे गट- राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात लढत होऊ शकते.
भगूरमध्ये शिंदे शिवसेना स्वतंत्र
भगूर नगरपरिषदेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला आव्हान देत भाजपाच्या मदतीने अजित पवारांच्या राष्ट्रवादीने स्वतंत्र उमेदवार दिला आहे. त्यामुळे भगूर नगर परिषदेत महायुतीतीलच शिंदे यांची शिवसेना आणि भाजप- राष्ट्रवादी एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. यामुळे भगूर नगरपरिषदेत महायुतीत फुट पडल्याची दिसून येत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची माघार
नगरपरिषद निवडणुकीतून मनसेने माघार घेतली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नाशिक जिल्ह्यातील 11 नगरपरिषदेच्या निवडणुकीत एकही अधिकृत उमेदवार उभा राहणार नाही. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक न लढण्याच्या सुचना दिल्याची माहिती स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिली.

