

नाशिक : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन पुढे जाणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आनंद सोहळ्यात सहभागी झाले पाहिजे. विलास शिंदे हा आमचा जुना कार्यकर्ता आहे. कार्यकर्त्यांच्या घरी काही कार्य असले की सर्वांनी यायला पाहिजे, अशी त्यांची अपेक्षा असते, असे नमूद करत कुठे जाणार? शेवटी शिंदे हे शिंदेंकडे जाणार, असे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्याबाबत सूचक विधान केले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्या कन्येच्या विवाहासाठी सोमवारी (दि. २) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर आले होते. त्याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विवाहानिमित्त शिंदे-पाटील परिवाराला मनापासून शुभेच्छा देत त्यांनी नववधू-वरास शुभेच्छा दिल्या.
विलास शिंदे यांच्या आग्रहामुळे शिंदे शिंदेंच्या भेटीला आल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, कार्यकर्त्यांच्या घरातील मंगलकार्य असेल तर आपण यावे, अशी त्यांची इच्छा असते. विलास आमचा जुना कार्यकर्ता असून, बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाणारा कार्यकर्ता असल्यानेच आपण इथे आहोत, असे नमूद करत त्यावरून वेगळी काही राजकीय गणिते मांडण्याची गरज नसल्याचे मंत्री शिंदेंनी स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे विलास शिंदे तसेच अन्य काही पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यात शिंदे यांच्या कन्येच्या विवाहाला एकनाथ शिंदे यांनी आवर्जून हजेरी लावल्याने त्यावरून अनेकांनी राजकीय आराखडे बांधण्यास सुरुवात केली आहे.