

नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख विलास शिंदे यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याची एकच चर्चा सध्या रंगत आहे. अर्थात त्यास कारणही तसेच असून, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या मुलीच्या लग्नात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजेरी लावणार आहेत.
पूर्वी एकच शिवसेना म्हणून काम करीत असताना, एकमेकांमध्ये ऋणानुबंध असल्याचे सांगितले जात असले, तरी ठाकरे गटातील 'आउटगोइंग' बघता उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीला अनेक अर्थाने चर्चिले जात आहे.
शहरप्रमुख विलास शिंदे यांच्या कन्येचा विवाह सोमवारी (दि. २) होत असून, या सोहळ्याला राज्यभरातील राजकीय नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत हे या सोहळ्याला उपस्थित राहणार असून, याखेरीज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती विशेष आकर्षण ठरत आहे. त्यांच्या नाशिक दौऱ्यात इतर कोणत्याही कार्यक्रमाचा समावेश नसल्याने चर्चेला वाव मिळत आहे. उपमुख्यमंत्री शिंदे दुपारी ३ च्या सुमारास लग्न सोहळ्यात उपस्थित राहणार असून, लगेचच ते मुंबईला परतणार आहेत.
याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये असून, तेदेखील लग्नसोहळ्यात जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात उडी घेतल्याने, ठाकरे सेनेला मोठा धक्का बसला आहे. आमदार नरेंद्र दराडे यांच्या पाठोपाठ माजी आमदार निर्मला गावित यांनी शिंदे सेनेत प्रवेश केल्याने, ठाकरे सेनेत सध्या चलबिचल बघावयास मिळत आहे. याशिवाय इतरही प्रमुख पदाधिकारी शिंदे सेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगत असल्याने, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीला अनेक अर्थाने बघितले जात आहे.
दरम्यान, कधी काळी संघटनेत एकत्र काम केल्याने, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विलास शिंदे यांच्यात ऋणानुबंध आहेत. त्यामुळे लग्नसोहळ्यासाठीच्या त्यांच्या उपस्थितीचा राजकीय अर्थ काढू नये, असे ठाकरे सेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.