नाशिक : भाजपने चांदवडमध्ये काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल यांनी कमळ हाती घेतल्यानंतर भाजपने सिन्नरमध्ये उबाठाला दुसरा धक्का दिला आहे. उबाठाचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे काका व माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे आणि त्यांच्या पत्नी तेजश्री वाजे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि.१४) भाजपमध्ये प्रवेश केला. वाजे यांनी सिन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली जाणार आहे. त्यामुळे महाजन यांनी इगतपुरीपाठोपाठ सिन्नरमध्येही उबाठाला मोठा झटका दिला आहे
नाशिक जिल्ह्यातील ११ नगरपालिका निवडणुकांचा प्रक्रिया सुरू असतांनाच भाजपमध्ये आपल्या मित्र पक्षासह विरोधकांना दणके देण्यास सुरूवात केली आहे. इगतपुरीचे उबाठाचे माजी नगराध्यक्ष संजय इंदूलकर यांना प्रवेश दिल्यानंतर चांदवडमध्ये कोतवाल यांच्या प्रवेशाने भाजपने काँग्रेसला धक्का दिला. त्यानंतर दुसऱ्याच दिवश खासदार वाजे यांचे काका व माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे आणि त्यांच्या पत्नी तेजश्री वाजे यांनी शुक्रवारी (दि. १४) नाशिक येथे भाजप कार्यालयात कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान, खासदार राजाभाऊ वाजे यांचे चुलत चुलते हेमंत वाजे यांनी कमळ हाती घेतल्याने उद्धव ठाकरे सेनेला सिन्नरमध्ये मोठा धक्का बसला आहे. यावेळी गिरीश महाजन यांच्यासह आमदार देवयानी फरांदे, जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, माजी आमदार बाळासाहेब सानप, उदय सांगळे, भारत कोकाटे, विजय साने, लक्ष्मण सावजी, संजय सानप, ज्ञानेश्वर कुर्हाडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोण आहेत हेमंत वाजे?
हेमंत वाजे हे नाशिक जिल्ह्याच्या पहिल्या महिला आमदार रुख्मिणीबाई वाजे यांचे पुत्र आहेत. त्यांचे वडील स्व. विठ्ठल वाजे यांनी सिन्नरचे नगराध्यक्षपद भूषविले आहेत. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत हेमंत वाजे हे शिवसेनेचे गटनेते होते. उबाठाचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे ते काका आहेत. हेमंत वाजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.