

चिपळूण : चिपळूण-गुहागर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी अचानक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याने गुहागर मतदारसंघात उबाठाला जोरदार धक्का बसला आहे. पक्ष फुटीच्या दृष्टिकोनातून आतापर्यंत एकसंध असलेल्या गुहागर मतदारसंघात उबाठाला हा पहिला धक्का बसला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात ऑपरेशन टायगरची सध्या जोरदार हवा आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी आमदार, माजी जि. प. अध्यक्ष, माजी जिल्हाप्रमुख, माजी सभापती असे अनेक महत्वाचे पदाधिकारी थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल होत आहेत. त्यामुळे राजापूर पासून मंडणगडपर्यंत उबाठा पक्षाला मोठी गळती लागल्याचे दिसून येत आहे. शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रत्नागिरी येथे झालेल्या पक्षप्रवेशाने जिल्ह्यात ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी होत असल्याचे समोर आले आहे.
विशेष म्हणजे शिवसेनेत फूट पडल्यानंतर प्रत्येक तालुक्यात त्याचे पडसाद उमटले. परंतु गुहागर विधानसभा मतदारसंघ त्याला अपवाद ठरला होता. येथील उबाठा अखंडीत, एकसंघ होती. परंतु आता येथे देखील बुरुज ढासळू लागला आहे. गुहागर मतदारसंघातील उबाठाचे माजी तालुकाप्रमुख व एक आक्रमक धाडसी नेतृत्व म्हणून ओळख असलेले अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप सावंत यांनी थेट शिवसेनेत प्रवेश करून खळबळ उडवून दिली आहे. त्यांचा पक्षप्रवेश राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे.
प्रत्यक्षात संदीप सावंत हे माजी खासदार विनायक राऊत यांचे अत्यंत जवळचे विश्वासू मानले जात होते. तसेच माजी मंत्री अनंत गीते यांच्यासाठी त्यांनी गुहागर मतदारसंघात मोठा संघर्ष करून काम केले होते. मात्र आमदार भास्कर जाधव यांच्या बरोबर संदीप सावंत यांचे मतभेद झाले. सावंत यांनी आ. जाधव यांच्या विरोधात टीकाटिप्पणी केली होती. पक्षातही ते नाराज होते.