नाशिक : विनायक पांडे व यतीन वाघ यांचा भाजप मध्ये प्रवेश होण्यापुर्वीचं शिवसेना उबाठाचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी समाज माध्यमांवरून दोघांची हकालपट्टी करण्यात आल्याचे घोषित केले. दिनकर पाटील यांनी भाजप कार्यालयातूनच मनसे अध्यक्षांना आपल्या पदाचा राजीनामा पाठवला. त्याचवेळी मनसेकडूनही पाटील यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे पक्षाकडून जाहीर करण्यात आले. खैरेंबद्दल कॉंग्रेसकडून कुठलीचं प्रतिक्रिया आली नाही.
दिनकर पाटील यांच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली होती. किंबहुना पाटील हे नाशिकमध्ये महाविकास आघाडीचे समन्वयकाची भूमिका पार पाडत होते. परंतु त्यांनी केलेला भाजप प्रवेश अनेकांना धक्का देणारा ठरला. मंत्री महाजन यांच्याशी एका हॉटेल मध्ये चर्चा झाल्यानंतर पाटील यांचा प्रवेश निश्चित झाला. भाजप विरोधात पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन सुरु असताना पाटील कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह गडकरी चौकात उभे होते. त्यांना यासंदर्भात विचारले असता गाणगापुरला देवदर्शनासाठी चाललो असे उत्तर त्यांनी दिले. मात्र मंत्री महाजन यांचे आगमन होणार असल्याची सूचना मिळताच पाटील यांचा ताफा गाणगापूर एेवजी भाजप कार्यालय वसंतस्मृतीच्या दिशेने वळला.
संजय चव्हाण परतले
स्थायी समितीचे माजी सभापती व शिवसेना उबाठा नेते संजय चव्हाण हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. किंबहुना विनायक पांडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना आपल्यासोबत संजय चव्हाण हे देखील भाजपात प्रवेश करत असल्याचे नमूद केले होते. चव्हाण यांना मुलीसाठी उमेदवारी हवी होती. परंतू भाजपकडून शब्द न मिळाल्याने त्यांचा भाजप प्रवेश थांबल्याची चर्चा आहे.