

नाशिक : लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांना लाभ देऊन राज्याच्या तिजोरीवर मोठा भार टाकण्यात आला असून, हा घोटाळा अर्थ खात्यातून झाला असल्याचा आरोप करत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अर्थमंत्री अजित पवार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
एका विवाह सोहळ्यानिमित्त नाशिकमध्ये आलेल्या खा. राऊत यांनी सोमवारी (दि. २) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना अर्थमंत्री पवार यांनी लाडकी बहीण योजनेत झालेल्या त्रुटी मान्य केल्याबाबत विचारणा करण्यात आले. यावर ते म्हणाले, या योजनेत शेकडो कोटी रुपयांचा गैरवापर झाला असून लाडक्या बहिणींनी नव्हे तर लाडक्या भावांनी महिलांची नावे वापरून फायदा घेतला. सरकारने लाभधारकांची छाननी न करता ही योजना राबवली. सरकारला याची पूर्ण माहिती असूनही त्यांनी मतांसाठी डोळेझाक केली. या प्रकाराची जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामाच दिला पाहिजे, अशा शब्दांत राऊत यांनी अजित पवारांवर निशाणा साधला.
पश्चिम बंगालमधील निवडणुकांमध्ये भाजप सत्तेवर येईल, असा दावा भाजप नेते अमित शाह यांनी केला आहे. यावर राऊत म्हणाले, महाराष्ट्रातील ईव्हीएम पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी पाठविण्याची योजना आहे. त्यासाठी पॅकिंग सुरू आहे. त्यामुळे २०२६ मध्ये बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजप सत्तेवर येईल, या शाह यांच्या दाव्यात तथ्य आहे.
दत्तक घेतलेल्या नाशिकचा फडणवीसांनी अनाथाश्रम करून टाकला, अशी जळजळीत टीका खा. राऊत यांनी केली. प्रयागराजमध्ये सर्व कंत्राटदार हे गुजरातमधून आले होते. नाशिकच्या कुंभमेळ्यात यापेक्षा काही वेगळे होईल, असे वाटत नाही. नाशिकमध्ये गुजरातचे ठेकेदार येणार आणि पाच ते दहा हजार कोटी घेऊन जाणार, असा घणाघाती आरोपही राऊत यांनी केला.