

नाशिक : मुंबई मनपात कमळ फुलवण्यासाठी भाजपने नाशिकमधील ‘शंभर प्लस’चा नारा बाजुला ठेवत अखेर शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी अजित पवार गटासमवेत युतीचा निर्णय घेतला आहे. भाजपचे प्रभारी गिरीश महाजन यांनी शिंदे गटाचे नेते शिक्षणमंत्री दादा भुसे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते माजी खासदार समीर भुजबळ यांच्याशी शुक्रवारी (दि.१९) महायुतीसंदर्भात प्राथमिक चर्चा केली. त्यानंतर तिन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांची पहिली बैठक शनिवारी (दि.२०) रात्री उशिरा पार पडली. यात जागावाटपावर चर्चा करण्यात आली. दरम्यान, या महायुतीमुळे भाजप, शिंदेगटाच्या जागावाटपाचे सूत्र बदलणार आहे.
नाशिक मनपाच्या होणाऱ्या निवडणुकीत महायुती होणार की स्वतंत्र लढणार याबाबत तर तर्कवितर्क लढवले जात असताना संकटमोचक गिरीश महाजन रात्री उशिरापर्यंत नाशिकमध्ये तळ ठोकून असल्याने महायुती बाबत चर्चा झाल्याचे सूत्रांकडून समजते. महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भुसे, आमदार सुहास कांदे, अजय बोरस्ते, हेमंत गोडसे, विलास शिंदे, प्रवीण तिदमे शिवसेनेतर्फे उपस्थित होते. राष्ट्रवादी अजित दादा गटाकडून माजी खासदार समीर भुजबळ व रंजन ठाकरे उपस्थित होते.
मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपची भूमिका स्पष्ट करत कार्यकर्त्यांची भावना राष्ट्रवादी व शिवसेनेच्या दोन्ही नेत्यांना कळवली. शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी महाजनांकडे पक्षाची भूमिका मांडली. दोन्ही पक्ष युतीसाठी सकारात्मक असल्याचे समजते. महाजनांनी अनुकूलता दर्शवल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नाशिकमध्ये महायुतीचा मार्ग सुकर झाल्याची चर्चा आहे.
दोन दिवसात जागावाटप
नाशिक मनपा निवडणूक महायुतीद्वारे लढवण्याच्या निर्णयाप्रत तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते आल्यानंतर शनिवारी सायंकाळी संयुक्त बैठक झाली. बैठकीत जागावाटपाच्या सूत्रावर मंथन झाले. दोन्ही पक्षाकडील सक्षम उमेदवार, विरोधी पक्षाची गणितांवर स्वतंत्रपणे प्रभागनिहाय चर्चा झाली. येत्या दोन दिवसात बैठकांच्या आणखी काही फेऱ्या होणार आहे. प्रभागनिहाय आणि उमेदवारनिहाय चर्चा होऊन जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला जाईल. त्यासंदर्भात आमदार सीमा हिरे यांनी राष्ट्रवादीसोबत बोलणी केली. दुसरीकडे आमदार सीमा हिरे, ॲड. राहुल ढिकले यांनी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांसोबत चर्चा सुरू केली आहे.
जागावाटपाचे सूत्र बदलणार
पहिल्या टप्प्यात भाजप आणि शिंदे गटात युती निश्चित झाली होती. त्यात भाजप ८० तर शिंदे गटाला ४० ते ४२ जागा दिल्या जाण्याची शक्यता होती. आता महायुतीत राष्ट्रवादीच्या एंट्रीने जागावाटपाच्या सुत्रात बदल होणार आहे. त्यानुसार भाजप ७७ पर्यत खाली येण्याची शक्यता आहे. शिंदे गटाला ३५ ते ३८ जागा मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याला ८ ते १० जागा मिळण्याची शक्यता आहे.
नाशिक मनपात महायुती करण्यासंदर्भात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत प्राथमिक चर्चा झाली. स्थानिक नेत्यांना जागावाटप संदर्भात चर्चा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आमची सकारात्मक बोलणी सुरू आहे.
गिरीश महाजन, कुंभमेळा मंत्री, तथा भाजप नेते.