

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या कायद्याचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या नाशिक शहरात आता वाहतुकीलाही शिस्तीचा नवीन अध्याय सुरू होणार आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या पुढाकाराने २० फेब्रुवारीपासून शहरातील ४० प्रमुख सिग्नल चौकांवर अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
सिग्नल न पाळणे, ट्रिपल सीट, राँग साइडने वाहन चालविणे आदी नियमभंग करणाऱ्यांवर आता थेट ऑनलाइन दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. या यंत्रणेद्वारे सिग्नल तोडणारी वाहने स्पष्टपणे कॅमेऱ्यात कैद केली जातील.
वाहन क्रमांकाच्या आधारे संबंधित वाहनमालकाच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ई-चलन पाठविले जाईल. त्यामुळे पोलिसांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय स्वयंचलित कारवाई होणार असून, नियमभंग टाळण्यास मोठी मदत होणार आहे.
दंड भरण्यासाठी वाहतूक शाखा तसेच पोलिस आयुक्तालयात विशेष काउंटरची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ठराविक मुदतीत दंड न भरल्यास संबंधित वाहनास आरटीओच्या कामकाजात अडथळे येणार असून, वाहन खरेदी विक्री, हस्तांतरण आदी प्रक्रियेदरम्यान ना हरकत प्रमाणपत्र मिळणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. सीबीएस, मेहेर सिग्नल, जुना गंगापूर नाका, शरणपूर चौकी, त्र्यंबक नाका, कॅनडा कॉर्नर, मुंबईनाका सर्कल, पेठ नाका, मखमलाबाद नाका, तारवाला चौक,
आयटीआय चौक, बिटको चौक, सिन्नर फाटा, दत्त मंदिर आदी प्रमुख चौकांवर ही यंत्रणा सुरू झाली आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून नियमभंगांवर ऑनलाइन कारवाई होणार आहे. नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन शहर वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे. वाढत्या वाहनसंख्येच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित व शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्थेकडे टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या सिग्नलवर यंत्रणा कार्यान्वित
सी.बी.एस, मेहेर सिग्नल, जुना गंगापूर नाका, शरणपूर चौकी, तरण तलाव, सांगली बँक, त्र्यंबक नाका, कॅनडा कॉर्नर, ए.बी.वी. सर्कल सीबल हॉटेल, जेहान सर्कल, सिटी सेंटर मॉल, बारदान फाटा, पाइपलाइन रोड, प्रसाद सर्कल, विद्या विकास सर्कल, खडकाळी गडकरी चौक, नागजी चौक,
मुंबई नाका सर्कल, पेठ नाका, काट्या मारुती चौक, सेवा कुंज, मखमलाबाद नाका, ड्रिम कॅसल चौक, तारवाला चौक, नवीन मार्केट चौक, मेरी चौक, राऊ हॉटेल, नांदूर नाका, मिर्ची ढावा, आयटीआय चौक, पपया नर्सरी, समृद्धी टी पॉइंट, महिंद्रा सर्कल, त्रिमूर्ती चौक, विहितगाव टी पॉइंट, बिटको चौक, सिन्नर फाटा, दत्त मंदिर,