

नाशिक : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना न्यायालयातून पुन्हा कारागृहात नेण्याची जबाबदारी असणाऱ्या कैदी पार्टी पथकातील पोलिसांनी एका हॉटेलमध्ये कैद्यांसोबत मांसाहारावर ताव मारल्याचा प्रकार शनिवारी (दि.१७) समोर आला आहे.
एका नागरिकाने पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांना पोलिस आणि कैद्यांच्या स्नेहभोजनाची माहिती देताच सहायक पोलिस आयुक्त आणि पोलिस निरीक्षकांच्या पथकाने छापा टाकल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. आयुक्तालयामार्फत या प्रकरणाची चौकशी सुरू असून सोमवारी (दि.१९) अहवाल सादर केला जाणार आहे.
पोलिस मुख्यालयातील चार पोलिस कर्मचाऱ्यांना शनिवारी कैदी पार्टीची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानुसार कैद्यांना नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयात सुनावणीसाठी आणणे. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा कारागृहात नेणे अशी जबाबदारी या कैदी पार्टीवर होती. त्यानुसार उपनगर व नाशिकरोड पोलिस ठाण्यांमध्ये दाखल खुनाच्या गुन्ह्यांमधील दोन संशयित आरोपींना पोलिस मुख्यालयातून अंमलदार दीपक जठार, विकी चव्हाण, गोरख पोपट गवळी यांच्यासह एकाने कारागृहातून न्यायालयात हजर केले. त्यानंतर पुन्हा कारागृहात नेण्यात येत होते. मात्र, कैदी पार्टीतील चौघा पोलिसांसह दोन कैद्यांनी उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलात मांसाहारावर ताव मारण्यास सुरुवात केली. ही बाब एका जागरूक नागरिकाने पोलिस आयुक्तांना कळवली. त्यानंतर अंबडचे सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख व गुन्हे युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या पथकाने हॉटेलमध्ये जाऊन पाहणी केली असता तक्रारीत तथ्य आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी कैदी पार्टीतील पोलिसांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली. तसेच दोघा कैद्यांना कारागृहात पाठवण्यात आले.
नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गत वर्षी झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात संशयित प्रफुल्ल विजय पाटील (२१) हा कारागृहात आहे. तर उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या कुंदन घडे या कैद्यास कैदी पार्टीने शनिवारी न्यायालयात आणले होते. मात्र न्यायालयातून थेट कारागृहात नेण्याएेजवी कैदी पार्टीतील पोलिसांनी हॉटेलमध्ये मांसाहारावर ताव मारल्याचे उघडकीस आले. न्यायालयातून निघाल्यानंतर दोघा संशयितांपैकी एकाच्या नातलगाने पोलिसांना जेवनाचा डब्बा दिल्याचे समजते.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कैदी पार्टीचे काम करण्यासाठी विशिष्ट पोलिसांचीच नेमणूक होत असते. कैद्यांना वेगवेगळ्या सुविधा पुरवण्याच्या मोबदल्यात आर्थिक गणित जुळवले जाते. त्यात मुख्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांचाही सहभाग असल्याच्या पोलिस दलातच चर्चा आहेत. न्यायालयातून संशयितांना आणल्यानंतर नातलगांची भेट घडवून आणणे, घरचा डब्बा व इतर वस्तू देणे, तंबाखूजन्य पदार्थ खाणाऱ्या कैद्यांकडे दुर्लक्ष करणे आदी प्रकार आर्थिक गणिताशिवाय होत नसल्याचे बोलले जाते. तसेच जिल्हा रुग्णालयातील 'प्रिझन वॉर्ड'मध्येही नेमणूकीसाठी काही पोलिस इच्छुक असतात. कारण येथेही आर्थिक गणित मोठ्या प्रमाणात होत असल्याचे आरोप वारंवार झाले आहेत.
जून २०१६ मध्ये कैदी पार्टीतील तिन पोलिसांनी खासगी वाहनाने टिप्पर गँगचा म्होरक्या समीर पठाण व सोनवणे यांना कारागृहात नेण्याएेवजी त्र्यंबकेश्वरला नेत मद्यपार्टी करीत मांसाहारावर ताव मारल्याचे समोर आले होते. सायंकाळी सात वाजता दोघा कैद्यांना कारागृहात सोडण्यात आले. मात्र हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने तिघा पोलिसांवर कारवाई केली होती.