नाशिक : मद्यपींचे अड्डे उद्धवस्त करण्यासाठी पोलीसांची मोहिम

नाशिक : मद्यपींचे अड्डे उद्धवस्त करण्यासाठी पोलीसांची मोहिम
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहर पोलिसांनी सुरु केलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर गेल्या काही दिवसांपासून मद्यपींविरोधातील तक्रारी वाढल्या आहेत. त्यानुसार शहर पोलिसांनी मद्यपींचे अड्डे उद्धवस्त करण्यासाठी मोहिम राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यात वाइन शॉपलगतचा परिसर, रस्त्यालगत व मोकळ्या ठिकाणी असलेल्या आडोशांवर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे मद्यपींसह अवैधरित्या व्यवसाय करणाऱ्यांना दणका बसेल असा विश्वास पोलिसांनी वर्तवला आहे. (liquor nashik ban)

शहर अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार शहरातील गुदामे व पानटपऱ्यांच्या तपासणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. शहरातील ३६५ पानटपऱ्यांची तपासणी करुन १६४ टपऱ्यांच्या चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर पोलिसांच्या ९९२३३२३३११ या व्हॉट्सअप क्रमांकावर तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीसह मद्यपी व अवैध मद्यविक्रेत्यांविरोधातील तक्रारींचा ओघ वाढल्याचे दिसून आले.

मद्य विक्री दुकानालगतच, काही मेडिकलमध्येही थंड पाण्याच्या बाटल्या, ग्लास, चखना विक्री सुरु असते. तसेच परिसरातील अंधारातच मद्यपी सर्रास मद्यसेवन करून गोंधळ घालत असल्याच्या तक्रारी व्हॉट्सअपवर आल्या. या स्वरुपाच्या अठरा तक्रारी पोलिसांना मिळाल्या आहेत. त्यानुसार पोलिसांनी अंमली पदार्थ, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, साठा करणाऱ्यांसह 'मद्यपींचे अड्डे' देखील रडारवर घेतले आहे.

या ठिकाणी मद्यपींचा वावर 
– शहरातील मद्यविक्रीच्या दुकानांलगत असलेल्या अंधारात
– जास्त वावर नसलेल्या इमारतींचे जीणे, वाहनतळ
– रस्त्यालगत अंधारात, झाडाच्या आडोशाला बसून किंवा उभ्याने मद्यसेवन केले जाते.
– काही मद्यविक्री दुकानांजवळ पैशांच्या मोबदल्यात मद्यसेवनासाठी जागा उपलब्ध करून देत असल्याच्या तक्रारी
– मोकळे भुखंड, अंधारातील उद्याने या ठिकाणीही मद्यपींचा वावर असतो
– अनकेदा हॉटेलबाहेरील पार्किंगमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी वाहनांमध्ये बसून मद्यसेवन केले जातात.

सातपूरमधील मोकळे भूखंड झाले मद्यपींचे अड्डे
सातपूर : परिसरातील क्रीडांगणे, उद्याने, मोकळे भूखंड हा परिसर मद्यपी, टवाळखोरांचा अड्डा झाला आहे. रात्रीच्या वेळी टवाळखोर मद्यपान करीत या ठिकाणी धिंगाणा घालून दहशत पसरवित आहेत. या मद्यपींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशोकनगर येथील वाइन शॉपसमोरील मोकळे भूखंड तसेच परिसरातील उद्यानांमध्ये रात्री टवाळखोर मद्याच्या बाटल्या पार्सल घेऊन उघड्यावर मद्यपान करतात. त्यानंतर शिवीगाळ करीत दहशत पसरवितात. याबाबत नागरिकांनी पोलिसांत तक्रार केल्यास या टवाळखोरांकडून नागरिकांना दमदाटी तसेच मारहाण केली जाते. या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी गस्त घालून या मद्यपी व टवाळखोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news