Nashik Traffic Signal | नाशिकमध्ये 2 कमांड सेंटरमुळे वाहतूक कोंडीचा फटका; सर्व सिग्नल एकाच छताखाली आणण्याची मागणी

Nashik Traffic Signal | शहरात सध्या नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या अखत्यारीत सुमारे ४०, तर महापालिकेच्या अखत्यारीत सुमारे २० वाहतूक सिग्नल कार्यरत आहेत.
Traffic Wardens
Traffic WardensPudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेतील तांत्रिक विस्कळीतपणा दूर करण्यासाठी शहरातील सर्व वाहतूक सिग्नल यंत्रणा एकाच केंद्रीकृत प्रणालीखाली आणण्याची मागणी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Traffic Wardens
FDA Nashik | FDA ची धडक कारवाई! नाशिक विभागात 10 दिवसांत 5 कोटींचा भेसळयुक्त अन्नपदार्थांचा साठा जप्त

महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या सिग्नल यंत्रणांचे नियंत्रण स्वतंत्र असल्याने वाहतूक परिस्थितीनुसार तातडीने निर्णय घेण्यात अडचणी येत असल्याचे त्यांनी पत्राद्वारे निदर्शनास आणले आहे. शहरात सध्या नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या अखत्यारीत सुमारे ४०, तर महापालिकेच्या अखत्यारीत सुमारे २० वाहतूक सिग्नल कार्यरत आहेत.

मात्र, दोन्ही यंत्रणांच्या 'सेंट्रलाइज्ड कमांड अँड कंट्रोल सिस्टीम' स्वतंत्र आहेत. त्यामुळे एखाद्या भागात वाहतूक कोंडी झाल्यास संपूर्ण मार्गावरील सिग्नेल्सचा समन्वय साधून त्यांच्या वेळेत तातडीने बदल करणे पोलिसांना शक्य होत नाही.

वाहतूक कोंडीच्या वेळी सिग्नलचा 'सायकल टाइम' आणि 'ग्रीन टाइम' बदलणे, सलग सिग्नेल्सचे समन्वित संचालन करणे, तसेच अपघात, मोर्चा, मिरवणूक किंवा व्हीआयपी बंदोबस्ताच्या वेळी वाहतुकीचा प्रवाह वळविणे यासाठी केंद्रीकृत नियंत्रणाची आवश्यकता असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

ग्रीन कॉरिडोअरलाही स्वतंत्र यंत्रणांचा अडथळा

रुग्णवाहिका, अग्निशामक दलाची वाहने तसेच पोलिस वाहनांसाठी तातडीने 'ग्रीन कॉरिडोअर' उपलब्ध करून देतानाही स्वतंत्र सिग्नल व्यवस्थेमुळे अडचणी निर्माण होतात. एखादा सिग्नल बंद पडल्यास किंवा तांत्रिक बिघाड झाल्यास संबंधित यंत्रणेशी स्वतंत्रपणे संपर्क साधावा लागतो. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत वेळेचा अपव्यय होण्याची शक्यता आहे.

Traffic Wardens
Nashik Simhastha Kumbh Mela | नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी आखाड्यांमध्ये दुफळी; शैव साधूंचे दोन गट आमनेसामने

सध्या काय स्थिती?

  • स्मार्ट सिटीच्या अखत्यारीत : सुमारे ४० सिग्नल

  • महापालिकेच्या अखत्यारीत : सुमारे २० सिग्नल

  • दोन्ही यंत्रणांचे कमांड सेंटर : स्वतंत्र

  • प्रस्तावित व्यवस्था : एकच केंद्रीकृत नियंत्रण प्रणाली

  • ऑपरेशनल ॲक्सेस : वाहतूक पोलिसांना थेट ॲक्सेस

  • उद्देश : कोंडी, आपत्कालीन वाहतूक आणि कुंभमेळ्यातील वाहतूक नियंत्रण अधिक गतिमान करणे

कुंभमेळ्यापूर्वी यंत्रणा एकत्र करण्याची मागणी

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात शहरातील वाहनांची संख्या, भाविकांची गर्दी आणि महत्त्वाच्या व्यक्तींच्या हालचाली मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका आणि स्मार्ट सिटी प्रशासनाने तांत्रिक समन्वय साधून सर्व सिग्नल एकाच 'सेंट्रल कमांड अँड कंट्रोल' प्रणालीशी जोडावेत, अशी मागणी आयुक्त कर्णिक यांनी केली आहे.

विशेष म्हणजे, या एकात्मिक यंत्रणेचे थेट 'ऑपरेशनल ॲक्सेस' वाहतूक पोलिसांना देण्याची सूचनाही करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष रस्त्यावरील वाहतूक परिस्थितीचा अंदाज घेऊन सिग्नलचे वेळापत्रक, 'ग्रीन टाइम' आणि वाहतुकीचा प्रवाह तत्काळ नियंत्रित करणे शक्य होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news