

नाशिक / पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ३० ऑक्टोबरला होणारी धर्मध्वज शोभायात्रा व नगरप्रदक्षिणा, ३१ ऑक्टोबरला होणारे ध्वजारोहण आणि गोदावरी आरती सुरक्षित व सुरळीत पार पाडावी, यासाठी शहर पोलिसांनी बुधवारी (दि. २१) 'फुल ड्रेस रिहर्सल' घेत बंदोबस्ताची रंगीत तालीम केली.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या सरावदरम्यान गर्दी व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण आणि आपत्कालीन उपाययोजनांची प्रत्यक्ष चाचणी करण्यात आली.
रामकुंड परिसरात दुपारी ४ ते सायंकाळी ७ या वेळेत ध्वजारोहणाच्या बंदोबस्ताचा सराव करण्यात आला. भाजीबाजार पटांगण परिसरात धर्मध्वज शोभायत्रेच्या मार्गावरील बंदोबस्ताचा आढावा घेण्यात आला. या सरावदरम्यान शोभायत्रेच्या मार्गावरील संभाव्य गर्दीची ठिकाणे, वाहतुकीतील बदल, संवेदनशील भाग आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत उपलब्ध करून देण्याच्या नियोजनाची पाहणी करण्यात आली.
पोलिस अधिकारी व अंमलदारांतील समन्वयावरही भर देण्यात आला. संभाव्य अडचणींची नोंद करून बंदोबस्तातील त्रुटी दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, चंद्रकांत गवळी, किशोर काळे, सहायक पोलिस आयुक्त डॉ. सचिन बारी, प्रमोद वाघ, माधव रेड्डी, शेखर देशमुख, संगीता निकम यांच्यासह विविध पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले. आगामी धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ही रंगीत तालीम महत्त्वाची ठरणार आहे.