

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील प्लेटिंग उद्योगांतून बाहेर पडणाऱ्या रसायनमिश्रित सांडपाण्याचा मुद्दा गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व प्लेटिंग उद्योगांचे तत्काळ फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक कृष्णा यांनी दिले आहेत.
शुक्रवारी (दि. ९) एमआयडीसी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या ऑनलाइन बैठकीत त्यांनी या प्रश्नाचा आढावा घेतला. उद्योगांमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यरत आहेत की नाहीत, याची तपासणी करून नियमांचे उल्लंघन आढळल्यास धडक कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
अंबड औद्योगिक वसाहतीलगतच्या रहिवाशांनी औद्योगिक प्रदूषणामुळे विविध आजार आणि त्वचारोगांचा त्रास होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दोन दिवसांपूर्वी परिसराला भेट दिली असता, नागरिकांनी त्यांच्या व्यथा मांडल्या होत्या. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही उद्योगांविरोधात बंदचे निर्देश दिल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने प्लेटिंग उद्योगांच्या कामकाजाची तपासणी करण्यावर भर दिला आहे.
दरम्यान, अभिषेक कृष्णा यांनी आदेश दिल्यानंतर प्रशासन अॅक्शन मोडवर आले असून, लवकरच उद्योगांचे फेरसर्वेक्षण केले जाणार आहे.
यंत्रणांची तपासणी
प्लेटिंग प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या रसायनमिश्रित सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावणे आणि त्यावर आवश्यक प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. मात्र, काही उद्योगांमधील सांडपाणी प्रक्रिया यंत्रणांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित झाल्याने संपूर्ण जिल्ह्यातील प्लेटिंग उद्योगांचे फेरसर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सर्वेक्षणात उद्योगांतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प प्रत्यक्षात कार्यरत आहेत का, त्यांची यंत्रणा योग्य प्रकारे चालते का आणि सांडपाण्याचे व्यवस्थापन नियमानुसार केले जाते का, याची तपासणी केली जाणार आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई
फेरसर्वेक्षणात सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा बंद असल्याचे किंवा नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळल्यास संबंधित उद्योगांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश अभिषेक कृष्णा यांनी दिले आहेत. त्यामुळे अंबडसह जिल्ह्यातील प्लेटिंग उद्योगांच्या कामकाजाची तपासणी होणार आहे. पर्यावरणविषयक नियमांचे पालन न करणाऱ्या उद्योगांवर प्रशासनाची नजर राहणार आहे