

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नोव्हेंबर महिन्यातच दुष्काळाची तीव्र धग जाणवत असून, नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. एकीकडे पाणीबचतीचे आवाहन केले जात असताना, रस्ते कामांमधील हलगर्जीपणाला आवर घालण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरत आहे. आतापर्यंत रस्तेकामांत जलवाहिन्या फोडण्याचे प्रकार अनेकदा समोर आले आहेत. शनिवारी (दि. २८) पाइपलाइन रोडवर असाच प्रकार घडल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले.
गंगापूर रोड समांतर रस्त्याच्या कामाला गती द्यावी, याबाबतची सूचना उपमहापौर विलास शिंदे यांनी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिली होती. अधिकाऱ्यांसमवेत त्यांनी रस्तेकामाची पाहणीदेखील केली. मात्र, कामे मार्गी लावताना सावधगिरी न बाळगता अत्यंत हलगर्जीपणाने खोदकाम केले जात असल्याने त्याचा फटका जलवाहिन्यांना बसत आहे.
मागील काही दिवसांपासून या रस्त्यावरून १८०० मिमी व्यासाच्या जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी हलगर्जीपणाने खोदकाम केले गेल्याने जलवाहिन्यांसह वीजवाहिन्या तोडण्याचे प्रकार समोर आले.
तासन्तास वीज गायब होत असल्याने, परिसरातील नागरिकांना हक्नाक त्रास सहन करावा लागत होता. याबाबतच्या तक्रारीदेखील केल्या गेल्या. मात्र, कामातील हलगर्जीपणा सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
शनिवारी दुपारी जेसीबीने खोदकाम केले जात असताना जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. डी-मार्टसमोरील चौफुलीलगत भाजीबाजारजवळ हा प्रकार घडला. यावेळी रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागली. दरम्यान, दुष्काळी परिस्थिती असताना विकासकामे करताना जलवाहिन्यांना नुकसान होणार नाही, याबाबत सावधगिरी बाळगावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
खोदकामामुळे विजेच्या केबल तुटण्याचे प्रकार अनेकदा घडले. मागील सोमवारी (दि. २३) खोदकामामुळे वीज केबल तुटल्याने गणेशनगर, सद्गुरू नगर, सोमेश्वर कॉलनी, खांदवेनगर भागांतील वीज दुपारी ३ पासून रात्री १० पर्यंत गायब होती. रात्री उशिरापर्यंत केबल जोडण्याचे काम सुरू होते. नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोन करून जाब विचारला असता, त्यांनी खोदकाम करणाऱ्या ठेकेदारांवर खापर फोडले.