

कळवण (नाशिक): कळवण नांदुरी रस्त्यावर दुचाकी व स्वीफ्ट कारमध्ये झालेल्या अपघातात दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले होते. दोघांनाही प्राथमिक उपचार करत नाशिकला हलवण्यात आले. मात्र, जखमी छायाचित्रकार भावेश योगेश कोठावदे (२२ ) यांचा मृत्यू झाला.
कळवणमधील किराणा व्यावसायिक योगेश कोठावदे यांचा तो एकुलता मुलगा होता. मंगळवारी (दि. २३) दुपारी दोनच्या सुमारास कळवण नांदुरी रस्त्यावर साकोरा पाडा या वळण रस्त्यावर दुचाकीने (एमएच ४१ बीबी ३१४५) भावेश कोठावदे (रा. कळवण) व तुषार तुळशीराम गांगुर्डे (२०, रा. पाळे) हे सप्तश्रृंग गडावर छायाचित्रणासाठी जात होते.
अभोणा येथील स्वीफ्ट कार (एमएच ४१ एझेड ९९९३) नांदुरीहून कळवणकडे येत असताना हा अपघात घडला. दरम्यान, जखमी दुचाकीस्वारांना कळवण व नंतर नाशिकला हलवण्यात आले होते. मात्र, भावेशला गंभीर मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. यातच त्याचे निधन झाले.