

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
इराण विरुद्ध अमेरिका-इस्त्रायल युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे दर कडाडले आहेत. त्यामुळे भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी चार दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ केल्याने, पेट्रोल-डिझेलच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०८ रुपये ८४ पैसे तर डिझेल ९५ रुपये ३५ पैसे प्रतिलिटरवर पोहोचले आहे. पेट्रोलपंपांच्या अंतरानुसार त्यात १५ पैशांची वाढ होत असल्याने, नाशिकमधील बऱ्याच भागात पेट्रोल १०९ रुपये प्रतिलिटर मिळत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी इंधनाचा जपून वापर करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनानंतर काही प्रमाणात काटकसरही केली जात आहे. मात्र, त्यात सातत्य नसल्याने, इंधनाची मोठी टंचाई निर्माण होण्याची भीती आहे.
दरम्यान, गेल्या शुक्रवारी देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी तीन रुपयांनी वाढ केली होती. त्यामुळे नाशिकमध्ये पेट्रोलचे दर १०४.७४ रुपयांवर थेट प्रतिलिटर १०७.९३ रुपयांवर पोहोचले होते. तर डिझेल ९४.४१ रुपयांवर पोहोचले होते. आता कंपन्यांनी पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एक रुपयाने वाढ केली आहे. त्यामुळे दराचा पुन्हा भडका उडाला आहे. दरम्यान, इंधन दरवाढीचा परिणाम सर्वच क्षेत्रावर झाल्याने, महागाईचा आणखी विस्फोट होण्याची शक्यता आहे.
इंधनाचे दर वाढल्याने, ट्रान्सपोर्टचे दर वाढले आहे. परिणामी सर्वच वस्तूंच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे. इंधन दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. मासिक किरणामध्ये ५०० ते १,५०० पर्यंतची वाढ झाली आहे. याशिवाय भाजीपाला दरात देखील मोठी वाढ झाल्याने, सर्वसामान्यांसह मध्यमवर्गीय या महागाईत होरपळून निघत आहेत. मध्य पूर्वेतील परिस्थिती पाहता, पुढचा काळ आणखी कठीण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पॉवर पेट्रोलचा मारा
शहरातील बहुतांश पेट्रोलपंपांवर पेट्रोल-डिझेलचा तुटवडा आहे. काही तास पुरेल इतकेच इंधन शिल्लक असल्याने, त्यानंतर पॉवर इंधनाचा पुरवठा केला जातो. शहरात पॉवर पेट्रोल ११७ रुपये ८७ पैसे प्रतिलिटर या दराने मिळत आहे. पेट्रोल शिल्लक नसल्याने, वाहनचालकांना नाइलाजास्तव पॉवर पेट्रोल घ्यावे लागत आहे.
इंधन दरवाढ ट्रान्सपोर्ट व्यवसायासाठी घातक आहे. अगोदरच उद्योगांना एलपीजी पुरवठा सुरळीत नसल्याने, उद्योग ठप्प पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यात डिझेल दरवाढ होत असल्याने, त्याचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तू महाग होण्यावर होणार आहे. ही दरवाढ भयंकर महागाई घेऊन येणारी असेल.
- सचिन जाधव, अध्यक्ष, मोटर मालक कामगार वाहतूक संघटना
अगोदरच ट्रान्सपोर्ट व्यवसाय संकटात आहे. त्यात इंधन दरवाढीची भर पडत आहे. डिझेल दरवाढ ही परवडणारी नाही. ट्रान्सपोर्ट महाग झाल्यास, सर्वच वस्तूंच्या किमती वाढणार आहेत. परिणामी महागाईचा विस्फोट होऊ शकतो. त्यामुळे सरकारने इंधनाचे दर आटोक्यात ठेवण्यावर भर द्यावा.
- संजय राठी, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक