अनाशिक : आदिवासी 17 संवर्ग पेसा पदभरतीसाठी कृती समितीतर्फे आज उलगुलान मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चात दीड लाख आदिवासी सामील होतील. शासनाने पेसा भरतीची मागणी त्वरीत मान्य करावी अन्यथा आदिवासींकडून नाशिक मुंबई हायवे बंद करण्यात येईल. जीवनावश्यक, गरजू, नाशवंत वस्तुंचे दळणवळण थांबल्याने जे काही नुकसान होईल, त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाची असेल. तरीही मागणी मान्य न झाल्यास शासकीय कार्यालयेही बंद करण्यात येतील, असा गंभीर इशारा आदिवासी नेते जे.पी. गावित यांनी दिला आहे.
नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, कळवण, देवळा, नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वरसह संपूर्ण राज्यातून आदिवासी बांधव उलगुलान मोर्चासाठी नाशिकमध्ये येणार आहेत. आज सकाळी 11 वाजता तपोवनातून मोर्चा निघणार असून निमाणी बसस्थानक - पंचवटी कारंजा - रविवार कारंजा - एमजीरोड- जिल्हाधिकारी कार्यालय -सीबीएस - त्र्यंबकनाकामार्गे आदिवासी विकास भवन येथे सभेद्वारे मोर्चाची सांगता होणार आहे. यानंतरही शासनाने मागणी मान्य न केल्यास नाशिक मुंबई हायवे बंद करण्यात येईल. शासकीय कार्यालयात कामकाज करु दिले जाणार नाही. आमच्या मागण्या शासन जोपर्यंत मान्य करत नाही तोपर्यंत आदिवासी ठिय्या आंदोलन करतील, असा इशारा गावित यांनी दिला आहे.
आदिवासी मंत्री विजयकुमार गावित यांची कृती समितीच्या शिष्टमंडळासोबत आज सकाळी 9 वाजेला बैठक आयोजित करण्यात आली असून पेसाभरतीबाबत चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीत तोडगा न निघाल्यास आंदोलन सुरुच राहण्याचा इशारा कृती समितीतर्फे देण्यात आला आहे.
गेल्या 10 वर्षापासून आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांना केवळ आदिवासी असल्यामुळे शासकीय नोकरी दिली गेली नाही. हा आमच्यावर अन्याय आहे. आम्ही हा अन्याय सहन करणार नाही. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरुच राहणार
- जे.पी. गावित. आदिवासी नेते
लाखो आदिवासी बांधवांना 8 दिवसाचे रेशन सोबत आणण्यास सांगण्यात आले आहे. जोपर्यंत पेसाभरतीची मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत आम्ही आदिवासी विकास भवनसमोरुन उठणार नाही. मुख्यमंत्र्यांना आमची मागणी मान्य करावीच लागेल.
- लकी जाधव, प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस कमिटी.