

नाशिक : सुरक्षित नाशिकअंतर्गत तयार केलेल्या 'पोलिस प्रेझेन्स' ॲपमध्ये अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीत महत्त्वाच्या ठिकाणांचे नकाशे 'अपडेट' करण्यात आले आहेत. त्यावरून पोलिसांमार्फत तंत्रस्नेही गस्त सुरू होणार आहे. तसेच औद्योगिक वसाहतींमधील रस्त्यांवर नाकाबंदीही तैनात करण्यात येणार आहे. (Patrolling in the area will be started from the 'Police Presence' app created under Nashik)
दिवाळीच्या सुट्यांमध्ये औद्योगिक वसाहतीतील कंपन्या बंद राहणार आहे. त्यामुळे या ठिकाणी नेहमीची वर्दळ कमी राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, सणोत्सव आणि विधानसभा निवडणुकीच्या बंदोबस्तात शहर पोलिस दलातील अधिकारी-कर्मचारी व्यस्त असणार आहेत. त्यातच शहरातील कायदा व सुव्यस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस सतर्क आहेत. औद्योगिक वसाहतींमध्ये गस्तीसाठी उद्योजकांच्या संघटनेच्या वतीने अतिरिक्त वाहने आणि सुरक्षारक्षक पोलिसांना देणार आहेत. तसेच कंपन्यांनी कामगारांचे दिवाळी बोनस व वेतन शक्यतो थेट बँकेत जमा करावे, असे आवाहनही पोलिसांनी उद्योजकांना केले आहे.
नागरिकांनी दिवाळीत व सुट्यांमध्ये विशेष दक्षता घेण्याचे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे. त्यात दागिने, पैसे, मौल्यवान वस्तू हाताळताना काळजी घ्यावी, बाहेरगावी जाताना शेजारच्यांनाही कल्पना द्या, तसेच परिसरातील सीसीटीव्ही कार्यान्वित ठेवा. संशयित व्यक्तींची माहिती '११२' या क्रमांकावर किंवा जवळील पोलिसांना कळवावी, असेही आवाहन पोलिसांनी केले आहे.
दिवाळीनिमित्त कंपन्यांना सुट्या असल्याने तेथील प्रमुख रस्त्यांवर, चौकांत नाकाबंदी केली जाईल. 'पोलिस प्रेझेन्स' ॲपमध्ये काही ठिकाणांचा समावेश केला आहे. तिथे पथक पोहोचल्यावर ऑनलाइन नोंद करतील. जेणेकरून पोलिसांचा वावर कायम राहील.
मोनिका राऊत, पोलिस उपायुक्त, परिमंडळ, नाशिक.