पंचवटी (नाशिक) : तपोवनातून पंचवटी अमरधामकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुरुवारी पहाटे तीन वाजता अमरधामच्या संरक्षक भिंतीजवळच्या झाडावर भरधाव कार धडकल्याने तिच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात सुरज संजय यादव (२१, रा. संकल्प सिध्दी अपार्टमेंट, सौभाग्यनगर, देवळाली कॅम्प) याचा मृत्यू झाला असून तिघेजण जबर जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे तीन वाजता यादव अतिशय वेगाने कार (एमएच ०१ बीयु ३११२) चालवत स्वामी नारायण मंदिराकडून अमरधामच्या दिशेने चालला होता. कन्नमवार पुलाखाली असलेले खड्डे व पुढे असलेले छोटेसे वळण यामुळे त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ११० किमी वेगाने धावणारी कार झाडावर जाऊन आदळली. पहाटेच्या निरव शांततेत झालेल्या या भीषण अपघाताच्या आवाजामुळे व जखमींच्या ओरडण्यामुळे परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेतली.
पंचवटी पोलिसांना याबाबतची माहिती कळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, सहायक निरीक्षक शरद पाटील, उपनिरीक्षक सचिन चव्हाण आदींनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या जखमींना पोलिसांनी बाहेर काढत रुग्ण वाहिकेद्वारे जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र सुरज यादव याचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला होता. तर राजेश हरी ठाकूर, प्रियांशू मोही विश्वकर्मा, सतीश संतोष यादव हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर कारचे स्पीडमीटर ११० किमीला लॉक झालेले आढळले. सुरज यादवच्या डोक्यास, पायास, चेहऱ्यास गंभीर दुखापत झालेली होती. अपघातग्रस्त कारमधील युवक देवळाली कॅम्प व विहितगाव परिसरातील असून मध्यरात्री कुठे चालले होते याबाबत निश्चित माहिती मिळालेली नव्हती. चारही युवक २१ ते २५ वयोगटातील आहेत. पंचवटी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंदविला असून हवालदार अमोल पाटील तपास करत आहेत.