Nashik Car-Tempo Accident | कार-टेम्पो अपघात मालेगावचे दोन व्यापारी ठार
मालेगाव (नाशिक): मालेगाव- चाळीसगाव रस्त्यावरील पिलखोड शिवारात कार व टेम्पोमध्ये झालेल्या अपघातात मालेगाव येथील दोन व्यापारी जागीच ठार तर चालकासह दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (दि.18) घडली. अब्दूल कुद्दूस इस्माईल (रा. इस्लामपुरा, मालेगाव) व अतिक शेठ खालिक गॅरेजवाले (रा. कुसूंबारोड, मालेगाव) यांचा समावेश आहे.
दोघे व्यापारी कामकाजानिमित्त इरटीगा कारने संभाजीनगर येथे जात असताना पिलखोड शिवारात कार व टेम्पोची समोरासमोर धडक झाली. यात हे दोघे व्यापारी ठार झाले. चालक फरान अब्दूल कुद्दूस व अल्ताफ शेठ अनाजवाले हे दोघे जखमी झाले.
दरम्यान, अपघातात ठार झालेले अब्दूल कुद्दूस यांचा मुलगा फरान कार चालवित होता अशी माहिती समोर आली आहे. अपघातानंतर सामाजिक कार्यकर्ते आसीम मौलाना यांनी याबाबत माहिती दिली. ठार झालेल्या दोघांचे मृतदेह मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात आणण्यात आले आहेत. तर जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मेहूणबारे पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाल्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण दात्रे यांनी सांगितले आहे.

