Nashik Outer Ring Road | शेतकऱ्यांच्या सहमतीनेच बाह्य रिंग रोडचा तोडगा

Nashik Outer Ring Road | जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आश्वासन; चर्चेनंतर आंदोलन स्थगित
Nashik Ring Road
Nashik Ring Road
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

येथील बाह्य रिंग रोड प्रकल्पावरून पेटलेल्या शेतकरी आंदोलनाला सोमवारी महत्त्वपूर्ण वळण मिळाले. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सविस्तर चर्चा करून येत्या आठवडाभरात प्रत्यक्ष ग्राऊंड स्कूटनी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले. शेतकरी, एमएसआयडीसीचे अधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून शेतकऱ्यांचे नुकसान कमीत कमी होईल, अशा चार ते पाच पर्यायी आराखड्यांची तयारी केली जाणार आहे.

Nashik Ring Road
Nashik Election 2026 | नाशिक विधान परिषदेवर शिवसेनाच दावा करणार! खासदार श्रीकांत शिंदेंनी जागावाटपाचा फॉर्म्युला केला स्पष्ट

त्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन अंतिम आराखडा निश्चित केला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी स्पष्ट केले. रिंग रोडबाधित २५ गावांतील शेतकऱ्यांनी रविवारी (दि. १७) बैठक घेऊन 'एक इंचही जमीन देणार नाही असा इशारा दिला होता. त्यानुसार सोमवारी (दि. १८) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाची हाक देण्यात आली होती.

सकाळपासूनच मोठ्या संख्येने शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमा झाल्यामुळे परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सुरुवातीला आंदोलकांना कार्यालयात प्रवेश नाकारण्यात आला. मात्र पोलिस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने छावा संघटनेचे पदाधिकारी आणि प्रत्येक गावातील प्रमुख शेतकरी यांना चर्चेसाठी बोलाविण्यात आले. जवळपास दोन तास चाललेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली.

चर्चेदरम्यान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शेतकऱ्यांना विश्वासात घेत महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. ते म्हणाले की, तीन ते चार दिवसांत एमएसआयडीसीचे अधिकारी आणि ग्रामस्थांनी संयुक्त ग्राऊंड स्कूटनी करावी. गाव तुमचे, रस्ता तुमचा आणि विकासही तुमचाच आहे; त्यामुळे निर्णयही सर्वसंमतीने घ्यावा.

बाह्य रिंग रोड होणे गरजेचे आहे, पण त्याच वेळी शेतकऱ्यांचे कमीत कमी नुकसान होईल, यालाही प्राधान्य दिले जाईल. चार पर्यायी प्लॅन तयार करून त्यातील तांत्रिकदृष्ट्या योग्य पर्याय निवडला जाईल. मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत अंतिम बैठक घेऊन सर्वानुमते आराखडा निश्चित केला जाईल. त्यांनी विंचूर गवळी गावातील तक्रारी निफाड प्रांत कार्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या.

Nashik Ring Road
Nashik Temperature 2026 | नाशिकचे तापमान 39.9 अंश सेल्सिअस; रस्ते निर्मनुष्य

तसेच मुंगसरे मातोरी भागातील आधीची मोजणी रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी मुद्देसूद लेखी तक्रार द्यावी, असेही सांगितले. या बैठकीला छावा संघटनेचे करण गायकर, माकपचे राजू देसले, अक्षय कातड, साहेबराव म्हैसधुणे, दीपक हगवणे, संदीप हगवणे, कमलाबाई किरकाडे, रत्ना शिंदे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या बैठकीत शेतकऱ्यांनी दि. २ मे रोजी शेतकरी अनुपस्थित असताना करण्यात आलेली जमीन मोजणी रद्द करण्याची मागणी केली. तसेच शेतकऱ्यांची घरे, विहिरी आणि सुपीक जमीन कमीत कमी बाधित होईल, अशा पद्धतीने बाह्य रिंग रोडचे एलायमेंट बदलावे, अशी आग्रही भूमिका घेतली. मोठ्या बिल्डर्सच्या जमिनी वाचविण्यासाठी शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावनादेखील काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली. यावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रत्येक मुद्द्यावर संयमाने स्पष्टीकरण देत शंका दूर करण्याचा प्रयत्न केला.

शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव मी स्वतः वेळ काढून प्रत्यक्ष पाहणीसाठी आलो होतो. या प्रकरणात माझी थेट भूमिका नसतानाही शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र माझ्याविषयी चुकीचे गैरसमज पसरवले जात आहेत. कृपया असे करू नका, अशी कळकळीची विनंती.

- आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news