

लासलगाव : राकेश बोरा
कांद्याच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताची स्पर्धा आता केवळ पारंपरिक निर्यातदार देशांपुरती मर्यादित राहिलेली नाही. पूर्वी कांदा आयात करणारा बांगलादेशही आता निर्यात बाजारपेठेच्या शोधात उतरला आहे. ज्याने भारताकडून लाखो टन कांदा खरेदी केला, तोच आता भारताच्या ग्राहक बाजारपेठेवर डोळा ठेवू लागला आहे. त्यामुळे नाशिकच्या कांदा उत्पादकांपुढे बांगलादेशचे आव्हान समोर ठाकले आहे.
२०२३-२४ मध्ये भारताच्या कांदा निर्यातीपैकी ४० टक्के कांदा बांगलादेशने खरेदी केला होता. आता बांगलादेश श्रीलंकेला कांदा निर्यात करण्याच्या तयारीत असल्याने नाशिकच्या कांद्यापुढे नव्या स्पर्धेचे आव्हान निर्माण झाले आहे. बांगलादेशचे वाणिज्यमंत्री खंदकार अब्दुल मुक्तादिर यांनी श्रीलंकेला कांदा-बटाटा निर्यातीची क्षमता तपासण्यासाठी पथक पाठवण्याची माहिती दिली. हाँगकाँग येथे श्रीलंकेचे व्यापारमंत्री वासंथा समरसिंगे यांच्यासोबत याबाबत चर्चा झाली.
बांगलादेशमध्ये अंतर्गत मागणी पूर्ण केल्यानंतरही कांदा व बटाट्याचा लक्षणीय अतिरिक्त साठा आहे. कांद्याच्या निर्यातीसाठी बांगलादेश आता श्रीलंकेसारखी नवीन बाजारपेठ शोधत आहे. वर्षभर दर्जेदार मालाचा पुरवठा, स्पर्धात्मक दर आणि आवश्यक असल्यास श्रीलंकेत गोदामांसह पायाभूत सुविधा उभारण्याची शक्यताही तपासली जाणार आहे. श्रीलंकेनेही बांगलादेशातून कांदा आणि बटाटा आयात करण्याबाबत स्वारस्य व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रातील कांद्याची निर्यात सध्या अनेक देशांत होत आहे. केंद्राच्या 'अपेडा'च्या माहितीनुसार २०२५-२६ मध्ये भारताने १५.४८ लाख टन कांदा निर्यात केला आहे. श्रीलंका, मलेशिया, संयुक्त अरब अमिराती, नेपाळ, बांगलादेश या बाजारपेठांत भारतीय कांद्याची निर्यात झाली. त्यामुळे बांगलादेशने स्वतःचा कांदा श्रीलंकेच्या बाजारात नेण्याची तयारी सुरू केल्यास नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी निर्यात बाजारपेठ दर टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.
कांद्याला चांगला भाव मिळण्यासाठी जागतिक बाजारपेठेत भारतीय कांद्याची स्पर्धात्मकता टिकणेही आवश्यक आहे. त्यामुळे भारताने निर्यात धोरणात सातत्य, वाहतूक खर्चात कपात, दर्जानुसार बाजारपेठ आणि दीर्घकालीन निर्यात व्यवस्था यावर भर देण्याची गरज असल्याचे कांदा उत्पादकांचे म्हणणे आहे.