

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
'अल निनों'च्या संकटामुळे पाऊस लांबण्याची शक्यता गृहीत धरून शहरात एकीकडे पाणीकपातीचा निर्णय घेताना, दुसरीकडे गंगापूर धरणातील मृतसाठा उचलण्यासाठी धरणात चर खोदण्याचा निर्णयही मनपाने घेतला आहे. विधान परिषद निवडणुकीची आदर्श आचारसंहिता संपुष्टात येताच चर खोदण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे.
चर खोदण्यासाठी तब्बल ११.६५ कोर्टीचे प्राकलन तयार करण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांनी दिली आहे. शहराला प्रामुख्याने गंगापूर धरणातून तसेच काही प्रमाणात मुकणे आणि दारणा धरणांतून पाणीपुरवठा केला जातो.
नाशिककरांना पिण्यासाठी या धरणांतून ६,४०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण मंजूर करण्यात आले होते. सद्यस्थितीत शहराला धरणांतून दररोज ६०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जात आहे. भारतीय हवामान खात्याने यंदा अल निनोमुळे पावसाचे उशिरा आगमन होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे पाणी आरक्षण ३१ जुलैऐवजी ३१ ऑगस्टपर्यंत पुरविण्याचे निर्देश जलसंपदा विभागाने मनपाला दिले आहेत.
सद्यस्थितीत १२ ऑगस्टपर्यंत पुरेल एवढेच पाणी आरक्षण शिल्लक आहे. त्यामुळे उर्वरित १८ दिवसांचा तुटवडा भरून काढण्यासाठी मनपाने शहरात पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जून व जुलैमध्ये दर शनिवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर ऑगस्टमध्ये दर दोन दिवसांआड पाणीकपात केली जाणार आहे.
पाणीकपात करतानाच धरणात चर खोदून मृतसाठा उचलण्याची तयारीदेखील मनपाने केली आहे. त्यासाठी फोरस्ट्रेस या सल्लागार संस्थेमार्फत खर्चाचा अंदाज दर्शविणारा अहवाल प्रशासनाला सादर झाला असून, निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने आयुक्तांच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला आहे. विधान परिषद निवडणुकीची आदर्श आचारसंहिता संपुष्टात येताच या कामासाठी निविदा जारी केली जाणार आहे.
यासाठी धरणात खोदणार चर
गंगापूर धरणाची पाणीपातळी ५९८ मीटर खाली गेल्यास पंपिंग स्टेशनच्या जॅकवेलपर्यंत पाणी पोहोचत नाही. त्यामुळे धरणात चर खोदून मृतसाठा जॅकवेलपर्यंत आणण्याचा प्रस्ताव आहे. चर खोदण्याच्या मार्गात महाकाय खडक अडथळा ठरत आहे. धरण मातीचे असल्यामुळे हा खडक फोडण्यासाठी डिटोनिटर्सचा वापर केल्यास धरणाला हादरा बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे तंत्रशुद्ध पद्धतीने खडकाचा अडथळा दूर केला जाणार आहे.
गंगापूर धरणातील जलसाठा ३१ ऑगस्टपर्यंत पुरवावा लागणार असल्यामुळे धरणातील मृतसाठाही उचलावा लागणार आहे. त्यासाठी धरणाच्या मध्यात चर खोदावा लागणार आहे. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात येताच या कामाच्या निविदा जारी केल्या जातील.
- रवींद्र धारणकर, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग