Nashik Municipal Corporation | नाशिक मनपात हप्तेखोरीचा 'विळखा'! अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश

Nashik Municipal Corporation | स्थायी बैठकीत आरोप : ठाण मांडून बसलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश
Nashik Municipal Election
Nashik Municipal ElectionPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अतिक्रमण निर्मूलन विभागातील अधिकारी, गाडीप्रमुखांच्या हप्तेखारीमुळे अतिक्रमणधारकांना पाठबळ मिळत असल्याचा आरोप स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी केला. या आरोपांची गंभीर दखल घेत अतिक्रमण विभागात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या अधिकारी व कर्मचारी तसेच गाडीप्रमुखांच्या बदल्यांचे आदेश सभापती मच्छिंद्र सानप यांनी दिले.

Nashik Municipal Election
Forest Department Raid | इगतपुरीत भोंदूबाबाच्या घरावर वनविभागाची धाड! वन्यजीवांच्या अवयवांसह आरोपी अटकेत

सभापती सानप यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या स्थायी समितीची सभा शुक्रवारी (दि.८) पार पडली. शहरातील वाढते अतिक्रमण, पेस्ट कंट्रोल, अग्निशमन विभागातील फायरमन भरती तसेच उद्यान निरीक्षकांच्या मुदतवाढीवरून या सभेत जोरदार खडाजंगी झाली.

अदिती पांडे यांनी शहरातील वाढत्या अतिक्रमणांना अतिक्रमण निर्मूलन विभागातील कर्मचाऱ्यांची हप्तेखोरी जबाबदार असल्याचा गंभीर आरोप करत केवळ फोटोसेशन करत कारवाईचा देखावा निर्माण केला जात असल्याचा आरोप केला.

अतिक्रमणधारक आणि अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांचे साटेलोटे असून, अतिक्रमण कारवाईची पूर्वसूचना अतिक्रमणधारक विक्रेत्यांना मिळत असल्याने पथक पोहोचताच अतिक्रमणे गायब तर पथक माघारी फिरताच अतिक्रमणे 'जैसे थे' होत असल्याने शहर अतिक्रमणांच्या विळख्यात सापडल्याचे आरोप करत संबंधित कर्मचारी तसेच गाडीप्रमुखांच्या बदल्या करण्याची मागणी पांडे यांनी केली. नाशिकरोडमध्येही अतिक्रमण कर्मचारी हप्ते वसुली करत असल्याचा आरोप जयश्री गायकवाड यांनी केला. त्यामुळे गाडीप्रमुख आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश यावेळी सभापतींनी दिले.

उद्यान निरीक्षकांच्या मुदतवाढीस विरोध

मानधनावरील आठ उद्यान निरीक्षकांच्या सहा महिन्यांच्या मुदतवाढीच्या प्रस्तावाला सदस्यांनी विरोध दर्शवला. त्याऐवजी विद्यमान पालिका कर्मचाऱ्यांची उद्यान निरीक्षकपदी नियुक्तीची मागणी करण्यात आली. यावेळी उद्यान निरीक्षक विवेक भदाणे यांनी मनुष्यबळाची वस्तुस्थिती मांडली.

उद्यान निरीक्षकांच्या १४ मंजूर पदांच्या तुलनेत केवळ दोनच पदे कार्यरत असल्याने आठ उद्यान निरीक्षकांना मानधनावर घेणे क्रमप्राप्त ठरल्याचे भदाणे यांनी स्पष्ट केले. उपअभियंता, लिपिक आणि सहायक कर्मचाऱ्यांच्या भरतीचीही मागणी भदाणे यांनी केली. फायरमन भरतीत स्थानिक उमेदवारांनाच प्राधान्य देण्याची मागणी सदस्यांनी केली.

Nashik Municipal Election
Nashik Tree Census 2026 | नाशिकच्या निसर्गसंपदेत वाढ! शहरातील वृक्षांची संख्या 50 लाखांच्या पार; मनपाची नवी गणना अंतिम टप्प्यात

अतिरिक्त आयुक्तांवरुन वादंग

अतिरिक्त आयुक्त अमित रंजन हे स्थायी समिती सभेत उशिराने आले. सभा सुरू असताना ते सभापतींची परवानगी न घेताच अचानक सभागृहातून निघून गेले. यामुळे सदस्यांनी तीव्र आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठकीत उपस्थित राहून सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणे अपेक्षित असताना अचानक निघून जाणे योग्य नसल्याची भावना मुकेश शहाणेंसह सदस्यांनी व्यक्त केली. पुढील सभेत अधिकाऱ्यांची अनुपस्थिती, गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा यावेळी सभापती सानप यांनी दिला.

म्हाडा प्रकरणामुळे मनपाची बदनामी

म्हाडा घरकुल घोटाळ्याचे पडसाद स्थायी समितीच्या सभेत उमटले. या प्रकरणात महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहायक संचालक कल्पेश पाटील यांना अटक झाली असून, अन्य अधिकारीही चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याने महापालिकेची बदनामी झाल्याचा आरोप करत सदस्यांनी प्रशासनावर टीकास्त्र डागले. या प्रकरणाची आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुकेश शहाणेंसह अनेक सदस्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news